मोहरमनिमित्त शहरात ताबूत मिरवणूक
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : बेळगावमध्ये धार्मिक सलोख्याचे प्रतीक असलेला मोहरम सण मुस्लीम आणि हिंदू बांधवांनी शुक्रवार दि. 26 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. हजारो भाविकांनी शहरातील ऐतिहासिक पंजा मिलन कार्यक्रमात भाग घेऊन समाजाला एकतेचा संदेश दिला.
मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना असून त्याला मोठे पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. हा महिना केवळ नवीन वर्षाची सुरुवातच नव्हे तर सत्य, न्याय आणि धर्माच्या रक्षणासाठी इराकमधील कर्बलाच्या युद्धात प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुस्सेन आणि त्यांच्या 72 अनुयायांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचेही प्रतीक आहे. जगभरातील मुस्लीम अन्याय आणि व्रुरतेविरुद्ध लढताना त्यांनी दिलेल्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या महिन्याचे पहिले दहा दिवस शोक पाळतात. विशेषत: उत्तर कर्नाटकाच्या काही भागामध्ये मुस्लीम आणि हिंदू बांधव पंजे स्थापन करून नवस पूर्ण करून झाल्यानंतर जातीय सलोख्याचा एक अनोखा उत्सव म्हणून हा महिना साजरा करण्यासाठी एकत्र येतात.
दरवर्षी सकाळी बेळगावच्या विविध भागातील पंजे शहरातील दरबार गल्लीतील जुम्मा मशिदजवळ जमतात. या कार्यक्रमासाठी गेल्या 10 दिवसांपासून तयारी केली जाते. दहाव्या दिवशी शहरातील कॅम्प, रुक्मिणीनगर, गांधीनगर, नाझर कॅम्प, अनगोळ, कणबर्गी, समादेवी गल्ली, काकतीवेस आदी गल्ल्यांतून पंजांची मिरवणूक काढून भेटी झाल्या. शेवटी टोपी गल्लीची पंजा मिरवणूक आल्यानंतर सर्वजण एकत्र आले. पुन्हा आपापल्या ठिकाणी परतले. यामध्ये मार्केट आणि खंजर गल्लीच्या ताबूत मिरवणुकीनेही सहभाग घेतला. सायंकाळी मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. फोर्ट रोडपासून सुरू झालेली मिरवणूक किल्ला तलाव येथे समाप्त झाली.