टॅक्सीचालकांचा अग्रिगेटरला विरोध कायम
आक्षेप नोंदविण्यासाठी पणजीत मोठी गर्दी : मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात
पणजी : टॅक्सीचालक संघटनांनी राज्यात ‘अॅप अग्रिगेटर’ला विरोध करणारी भूमिका कायम ठेवली आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना आक्षेप नोंदवण्यासाठी राज्यभरातील टॅक्सीचालकांनी काल सोमवारी जुंता हाऊस येथे गर्दी केली होती. गर्दी वाढल्याने वाहतूक खात्याने आक्षेप स्वीकारण्यासाठी पाच विशेष काऊंटर सुरू केले होते. वाहतूक खात्याकडे आक्षेप नोंदविण्याबरोबरच विविध मतदारसंघांतील टॅक्सीचालकांनी आपले मंत्री, आमदारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. राज्यभरातील टॅक्सीचालक जुंता हाऊस परिसरात दुपारी जमू लागले होते. दुपारनंतर आक्षेप नोंदवण्यासाठी मोठी रांग लागली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा परिसर तसेच पणजी पोलिसस्थानक परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र टॅक्सीचालकांनी आंदोलन करण्यास नव्हे, तर केवळ आक्षेप नोंदविण्यास आल्याचे स्पष्ट केले.
सरकारचा डाव हाणून पाडणार
गोव्यातील सर्व व्यवसाय स्थानिकांच्या हातून गेले आहेत. टॅक्सी अॅपच्या माध्यमातून हा टॅक्सीचा व्यवसायही आता खाजगी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव आहे. हा व्यवसाय आमच्या हातातून गेला तर आम्ही रस्त्यावर येणार आहोत. यासाठी आमचा याला विरोध कायम आहे, कोणत्याही स्थितीत सरकारचा हा डाव साध्य होऊ देणार नाही, असे टॅक्सी संघटनेचे योगेश गोवेकर यांनी सांगितले. सरकारने अधिसूचनेबाबत आक्षेप देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानुसारच आम्ही आक्षेप नोंदवण्यासाठी आलो होतो. आंदोलन करणे किंवा दंगा करणे हा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे येथे एवढा पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज नव्हती. कदाचित सरकार आम्हाला घाबरत असावे. आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करत आहोत. पुढील काही दिवसात दहा हजाराहून अधिक टॅक्सीचालक अॅपच्या विरोधात आक्षेप नोंदवणार आहेत. यामध्ये रेंट ए कारचा मुद्दा आणून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.
अॅग्रिगेटरला केवळ दहा टक्के आक्षेप : प्रविमल अभिषेक
गोवा ट्रान्सपोर्ट अॅग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वांना प्रतिसाद म्हणून काही टॅक्सी संघटनांनी काल 2 जून रोजी राज्यातील टॅक्सी चालकांना सामूहिकपणे हरकती सादर करण्याचे आवाहन केले होते. तथापि, या आवाहनाला मर्यादित प्रतिसाद मिळाला. केवळ 1,607 हरकती पत्रे सादर करण्यात आली. ही संख्या गोव्यातील नोंदणीकृत टॅक्सींचालकांपैकी केवळ 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे, असे वाहतूक खात्याचे संचालक प्रविमल अभिषेक यांनी सांगितले. या हरकती पत्रांमध्ये वारंवार व्यक्त झालेली चिंता किंवा सूचनामध्ये म्हटले गेले आहे की, अॅग्रीगेटरची व्याप्ती पॉईंट-टू पॉईंट पिकअप आणि ड्रॉप सेवांपुरती मर्यादित असावी आणि त्यांना स्थानिक पर्यटनस्थळे, उपक्रमांसाठीची वाहतूकसेवा, क्रूझ बुकिंग आणि पारंपरिकपणे स्थानिक ऑपरेटरद्वारे हाताळल्या जाणाऱ्या इतर विशेष सेवा यासाठी बुकिंग करण्याची किंवा सुविधा देण्याची परवानगी देऊ नये.
काही चालकांनी काही व्यावहारिक आव्हानांकडेही लक्ष वेधले, जसे की काही भागात खराब मोबाईल नेटवर्क कव्हरेज, स्मार्टफोनची उपलब्धता नसणे आणि काही कामगारवर्गामध्ये मर्यादित डिजिटल साक्षरता अशा काही वास्तववादी आव्हानांकडेही काही चालकांनी लक्ष वेधले आहे. काही चालकांनी वाढत्या इंधनाच्या किमतीनुसार भविष्यात भाडे रचनेत सुधारणा करण्याची गरज असल्याची सूचनाही मांडली आहे. अनेक पत्रांमधून पर्यावरणपूरक सुधारणा सुचवल्या गेल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शाश्वत वाहतूक पद्धतींना प्रोत्साहन देणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देणे आदी सूचनांचा समावेश आहे. त्याचबरोबर, चालक कल्याण आणि हक्कांचे संरक्षण करण्याचे महत्त्व काही चालकांनी अधोरेखित केले आहे. सरकारने मार्गदर्शक तत्त्वांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा विचार करावा, असेही काही चालकांकडून सरकारला सूचवण्यात आले आहे. मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम रूप देण्यापूर्वी विविध घटकांकडून प्राप्त झालेल्या सूचना, हरकती, अभिप्राय यांचा योग्य विचार शासनाकडून केला जाईल, असेही ते म्हणाले.
टॅक्सीवाल्यांनी विरोधाऐवजी उपाय सांगावा : खंवटे
टॅक्सी अॅग्रिगेटर अॅपला विरोध करण्याऐवजी टॅक्सीवाल्यांनी सूचना देऊन उपाय सांगावा. फक्त विरोध करण्यात अर्थ नाही, असे निवेदन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे. विरोधासाठी विरोध करणे चुकीचे आहे. अॅप नको तर काय पाहिजे ते टॅक्सीवाल्यांनी सांगावे. रेंट-अ-बाईक, कार प्रकरणी मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे म्हणणे रास्त असून सरकारने त्याबाबत फेरविचार करावा. विरोधामुळे गोंधळ वाढतो. सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटतात आणि राज्याचे नाव खराब होते. त्याचा परिणाम होऊन पर्यटक कमी येतात म्हणून राज्याच्या हिताचे बोला, असे खंवटे म्हणाले.