मोपावरील टॅक्सीचालक हैराण
मुख्यमंत्र्यांना भेटून शुल्काबाबत मांडली कैफियत
पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा स्थानिकांच्या फायद्यासाठी उपयोगात यावा, यासाठी राज्यातील व्यावसायिकांची प्रमुख मागणी होती. परंतु आता या विमानतळावर स्थानिकांपेक्षा गोव्याबाहेरील किंवा नोंदणी नसलेल्यांनाच अधिक फायदा होत आहे. मोपा विमानतळावर पार्किंग शुल्कामुळे स्थानिक टॅक्सी चालक हैराण झालेले आहेत. हा मुद्दा घेऊन काल, बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो-पणजी येथे भेट घेतली.
याबाबत टॅक्सीचालक संघटनेचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले की,मोपा विमानतळावर स्थानिक टॅक्सी चालकांना दुय्यम प्रकारची वागणूक मिळत आहे. विमानतळावरील पार्किंग शुल्कामुळे स्थानिक टॅक्सी चालकांचा जीव हैराण झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे चर्चेसाठी आलो होतो. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे लक्ष घालतील आणि स्थानिक गोमंतकीय टॅक्सी चालकांचाच विचार करतील, ही अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आल्तिनो-पणजी येथे टॅक्सी चालक आल्यानंतर त्यांना पोलिसांनी काही काळ रोखून धरले होते.