अमेरिकेतील कर आता 10 टक्के
नवीन टॅरिफ आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी : फेडरल न्यायालयाच्या दणक्यानंतर अमेरिकन सरकारची नरमाई
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याअंतर्गत (‘आयइइपीए’) लादलेले परस्पर कर बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एक नवीन जागतिक कर आदेश जारी केला. नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार भारतासह सर्व देशांमधील आयात वस्तूंवर आता तूर्तास केवळ 10 टक्के इतका एकसमान कर आकारला जाईल. हे नवीन कर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ‘आयइइपीए’ करांची जागा घेणार असून त्याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी भारतासाठी हा कर 18 टक्के इतका निर्धारित करण्यात आला होता.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफ शुल्कांना बेकायदेशीर घोषित केल्यानंतर काही तासांतच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगभरातील सर्व देशांमधून होणाऱ्या आयातीवर 10 टक्के जागतिक शुल्क लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. नव्या आदेशानुसार भारतासह अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांना अमेरिकेत आता केवळ 10 टक्के कर आकारला जाईल. काही देशांना यापूर्वी यापेक्षा जास्त कर निर्धारित केले असले तरी अमेरिकेला आता त्यात कपात करावी लागणार आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या व्यापक आणि अनेकदा मनमानी कर रद्द केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ करांमुळे त्यांच्या प्रमुख आर्थिक धोरणावर तीव्र टीका झाली होती. तसेच आता अमेरिकेतील सर्वोच्च म्हणजेच फेडरल न्यायालयाने दिलेल्या टॅरिफ झटक्यांनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेतील आयातीवर 10 टक्के कर लादला. नवीन टॅरिफ आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबत स्पष्ट भाष्य करताना नवीन कररचना लगेचच चालू होत असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याअंतर्गत (‘आयइइपीए’) त्यांनी लादलेले परस्पर शुल्क बेकायदेशीर घोषित केले. या निर्णयानंतर ट्रम्प यांनी 10 टक्के जागतिक शुल्क लादण्याची घोषणा केली. हा नवीन आदेश सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी रद्द केलेल्या ‘आयइइपीए’वर आधारित शुल्कांची जागा घेईल. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांनी परस्पर व्यापारावरील अंतरिम करारासाठी एक चौकट गाठल्यानंतर ट्रम्प यांनी भारतावरील परस्पर शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केले होते.
व्हाईट हाऊसकडून करकपातीला दुजोरा
डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर घोषित झाल्यानंतर आणि त्यानंतर ट्रम्प यांनी नवीन जागतिक टॅरिफ जाहीर केल्यानंतर भारतासह देशांना आता फक्त 10 टक्के टॅरिफ भरावा लागेल का हा मोठा प्रश्न आहे. मात्र, व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुसरी अधिकृतता लागू होईपर्यंत 10 टक्के टॅरिफ लागू राहील. याचा अर्थ असा की अमेरिकेत भारतीय वस्तूंच्या आयातीवर आता 18 टक्के नव्हे तर 10 टक्के टॅरिफ लागू झाला आहे.
ट्रम्प यांचा निर्णय अवैध घोषित
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांविरुद्ध लावलेले कर बेकायदेशीर घोषित केल्यामुळे ट्रम्पना मोठा धक्का बसला आहे. परंतु भारतालाही मोठा दिलासा मिळाला आहे. हे कर रद्द केल्यानंतर ट्रम्प यांनी दुसऱ्या नियमानुसार सर्व देशांवर 10 टक्के कर लादण्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार करार बोलणी अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे.