ईव्ही दुचाकीसह अन्य 100 वस्तूंच्या करात बदलाची अपेक्षा
जीएसटी कौन्सिलच्या 20 ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) 100 हून अधिक वस्तूंवरील कर दर सुधारित करण्याच्या योजनांसह जीएसटीदर लागू करण्याचा विचार केला आहे. पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, जीएसटी 12 वरून 5 टक्के करण्यावर विचार केला जात आहे आणि पुढील बैठक 20 ऑक्टोबरला होणार असल्याने त्यावेळी या संदर्भातील गोष्टींवर बोलले जाणार असल्याची माहिती आहे.
बुधवारी झालेल्या बैठकीत, जीओएमने सध्या 12 टक्के कर स्लॅबमध्ये येणाऱ्या वैद्यकीय आणि औषधी वस्तूंवरील कर दर कमी करण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली. भट्टाचार्य म्हणाले की, या कपातीमुळे होणारे संभाव्य महसूल नुकसान रोखण्यासाठी, जीओएम काही वस्तूंवर जीएसटी वाढवण्याचे पर्याय शोधत आहे, जसे की वायूयुक्त पाणी आणि पेये, ज्यावर सध्या 28टक्मके कर आहे. .
भारतात सध्या 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28टक्के दरांसह चार जीएसटी स्लॅब आहेत. 2024 मध्ये सरासरी जीएसटी दर 11.56 टक्के आहे जो 15.3 टक्क्याच्या महसूल तटस्थ दरापेक्षा कमी आहे. जीएसटी परिषदेच्या 20 ऑक्टोबरच्या बैठकीनंतर जीओएमच्या शिफारशी सादर केल्या जातील, ज्यामध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.