For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेनेच्या संख्याबळावर तटकरेंचे ‘राजकीय वजन’ भारी

06:52 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवसेनेच्या संख्याबळावर तटकरेंचे ‘राजकीय वजन’ भारी
Advertisement

‘रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत मुलगा अनिकेत तटकरे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळवून देण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यशस्वी झाले आहेत. वास्तविक या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडे सर्वाधिक मते आहेत. पण शिवसेनेच्या या संख्याबळावर तटकरेंचे राजकीय वजन अधिक भारी पडले, असेच म्हणावे लागेल.  तटकरेंनी शिवसेनेचे ‘दबावतंत्र’ निष्प्रभ करत महायुतीच्या काळातसुद्धा या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कायम ठेवला.

Advertisement

राज्यात स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होऊन 22 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. ‘रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ मतदारसंघात एकूण सहा उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. येथे महायुतीबरोबरच महाविकास आघाडीतही बंडखोरी झालेली आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून असून त्याचदिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

अनिकेत तटकरे गेल्या वेळेला याच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे यावेळेसही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावा, यावर सुनील तटकरे ठाम होते. सदस्य संख्या कमी असली तरी त्यांनी मतदारसंघावरील पक्षाचा दावा सोडला नाही. पण अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीवरून महायुतीतील शिंदे शिवसेनेत मोठी नाराजी उफाळून आली. विशेषकरून रायगड जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध दर्शवला. रायगडात गेली दोन वर्षे ‘सुनील तटकरे विरुद्ध शिंदे शिवसेना’ असा जोरदार राजकीय संघर्ष सुरु आहे. दोन्ही पक्षातील वादामुळे रायगड पालकमंत्री पदाचा निर्णयही स्थगित ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. त्यापैकी भरत गोगावले कॅबिनेट मंत्री आहेत. पण गेली दोन वर्षे त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळू शकलेले नाही. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरेदेखील कॅबिनेट

Advertisement

मंत्री आहेत. त्यांनादेखील शिवसेनेने पालकमंत्री होऊ दिलेले नाही. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही या दोन्ही पक्षांमधील संघर्षाची धार कायम होती. रायगड जिल्हा परिषदेत शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. परंतु, राष्ट्रवादीने ऐनवेळी भाजपला सोबत घेऊन शिवसेनेला जिल्ह्याच्या सत्ता केंद्रापासून दूर ठेवण्याची दक्षता घेतली. तेथे पहिल्या सव्वा वर्षांसाठी भाजपला जि.प.अध्यक्षपद दिले. ही सर्व पार्श्वभूमी पाहता, अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध होणार हे स्पष्टच होते. पण महायुतीतील नेत्यांशी असलेले वैयक्तिक संबंध व राजकीय प्रगल्भतेमुळे तटकरे यांनी कोकणातील या जागेवरील आपली पकड सैल होऊ दिली नाही. महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर असूनसुद्धा त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे कायम ठेवला.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण 1018 मतदार आहेत. यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि पनवेल महानगरपालिकेतील सदस्यांचा समावेश आहे. तीन जिल्हा परिषद परिषदेतील 165 आणि पंचायत समिती सभापतींची 32 तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील 821 सदस्यांचा समावेश आहे. पक्षनिहाय मतांचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक 305, भाजपचे 276 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 127, काँग्रेसचे 50, ठाकरे शिवसेनेचे 55 सदस्य आहेत. शिंदे शिवसेना सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी मागणी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली. माजी आमदार राजन साळवी यांनी हीच आकडेवारी सादर करून शिंदे शिवसेनेकडून आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. पण त्याचवेळी चिपळूण तालुका शिवसेनेच्या बैठकीत माजी आमदार सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे उमेदवारीवरून शिंदे शिवसेनेतच समन्वय नसल्याचे रत्नागिरीत स्पष्ट झाले होते.

तर दुसरीकडे तटकरेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. या गोष्टीचा अंदाज येताच रायगडमधील शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरीचे निशाण रोवले. सोमवारी अंतिम मुदत असताना शनिवारीच त्यांनी आपला अर्ज भरला. रायगडात तटकरे महायुतीचा धर्म पाळत नाहीत. वेळोवेळी शिवसेनेच्या विरोधात जातात, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या अर्ज मागे घ्यायला सांगितला तर आम्ही एकत्रित चर्चा करून एकवेळ अर्ज मागे घेऊसुद्धा. पण अनिकेत तटकरेंचा प्रचार करणार नाही, असे जुईली यांनी महायुतीकडून तटकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याअगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीसमोर पेच कायम आहे. दरम्यान, जुईली यांची उमेदवारी ही रायगडचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी शिवसेनेची एक राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसे असेल तर शिंदे शिवसेनेची ही खेळी यशस्वी होईल का, याचीच उत्सुकता आहे.

महेंद्र पराडकर

Advertisement
Tags :

.