टाटा टेक्नॉलॉजीजची बाजारात जोरदार मुसंडी
शेअर बाजारात कंपनीचा मजबूत प्रवेश : 140 टक्क्यांच्या परताव्यासह बाजारात एंट्री
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात जवळपास दोन दशकांनंतर, टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा बाजारात आयपीओ आला आणि त्याने शेअर बाजारात दमदारपणे प्रवेशही केला. ऑफर किंवा सेल असूनही, गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिल्याचा फायदा कंपनीला झाल्याचे दिसून आले.
गुरुवारी शेअर बाजारात टाटा टेक्नॉलॉजीज आणि गंधार ऑईलच्या समभागांनी अत्यंत दमदार अशी एंट्री मिळवली. टाटा टेक 500 च्या इश्यू किंमतीपेक्षा 140 टक्क्यांनी अधिक राहिला. यात टाटा टेकचे समभाग 1200 रुपयावर लिस्ट झाले.
3042 कोटींचा आयपीओ
टाटा टेकच्या 3042 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 1.56 लाख कोटींहून अधिक किमतीच्या बोली प्राप्त झाल्या, जो 22 नोव्हेंबर रोजी खुला झाला. टाटा टेक ही ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. टाटा समूहाने जवळपास 19 वर्षांनंतर हा आयपीओ बाजारात आणला होता.
टाटा टेकच्या दोन प्रकारच्या सेवा
सेवा : ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग क्लायंटला अधिक चांगली उत्पादने डिझाईन, विकसित आणि वितरित करण्यासाठी मदत करण्यास कंपनी आउटसोर्स अभियांत्रिकी सेवा व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा प्रदान करते.
टेक्नॉलॉजी सोल्यूशन : कंपनी तिची उत्पादन व्यवसायाद्वारे, तृतीय पक्ष सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन्स सारखी उत्पादने, जीनवचक्र व्यवस्थापन सॉफ्टवेअर विकते. यासह सल्ला, अंमलबजावणी, प्रणाली एकत्रीकरण आणि समर्थन अशाही सेवा देते.
गंधार ऑईलला मिळाल्या 23,000 कोटींच्या बोली
गंधार ऑईल कंपनीचा आयपीओ 64.7 पट सबस्क्राइब झाला आहे. यामध्ये 23,000 कोटींच्या बोली प्राप्त झाल्या होत्या. आयपीओची किंमत 160 ते 169 रुपये बँड होती. कंपनीने 500.69 कोटी रुपये उभारण्यासाठी हा आयपीओ आणला होता.