टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ लवकरच बाजारात येणार
22 नोव्हेंबर रोजीची तारीख निश्चित : 2 दशकानंतर आयपीओचे सादरीकरण
नवी दिल्ली
टाटा समूहातील बहुप्रतिक्षीत टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येत्या 22 नोव्हेंबरला खुला होणार आहे. दोन दशकानंतर टाटा समूहातील आयपीओ बाजारात दाखल होत आहे.
अभियांत्रिकी आणि उत्पादन विकासात लक्ष घालणारी महत्त्वाची कंपनी म्हणून टाटा टेक्नॉलॉजीजचा उल्लेख होतो. देशातील दिग्गज उद्योग समूह टाटाची ही कंपनी आहे. याआयपीओअंतर्गत 60.9 दशलक्ष समभागांची विक्री कंपनी करणार आहे. तसेच दुसरीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स आयपीओतील 11.4 टक्के इतका हिस्सा विकणार असणार असल्याचे सांगण्यात येते.
कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबरला खुला होत असून 24 नोव्हेंबरला बंद होत आहे. यादरम्यान गुंतवणूकदारांना यात बोली लावता येणार आहे. याआधी टाटा समूहाने 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आयपीओ बाजारात आणला होता. 9 मार्च 2023 रोजी कंपनीने सेबीकडे आयपीओकरीता अर्ज केला होता. असं जरी असलं तरी कंपनीने अद्याप आपल्या आयपीओअंतर्गत समभागाची किमत जाहीर केलेली नाही.