टाटा स्टिलच्या नफ्यात 7 पट वाढ
मुंबई :
पोलाद क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टीलने आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये 7 पट वाढ नोंदवली आहे. कंपनीने सदरच्या तिमाहीमध्ये 2688 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये हा नफा 326 कोटी रुपयांचा होता. हा नफा पाहिल्यास वर्षाच्या आधारावर 723 टक्के इतकी जबर वाढ नोंदवली गेली आहे.
कंपनीच्या नफा मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. या मागच्या तिमाहीमध्ये कंपनीने 3101 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. त्या तुलनेमध्ये चौथ्या तिमाहीत नफा 13 टक्के कमी दिसून आला. यादरम्यान कंपनीने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत 6 टक्के वाढीसोबत 56 हजार 646 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत 53231कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता.
कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन म्हणाले की, जागतिक पातळीवरती आव्हाने भरपूर आहेत. चीनमधून पोलादाची निर्यात अधिक होत असून ती 119 दशलक्ष टनवर पोहोचली आहे. ही निर्यात 2015 च्या तुलनेत विक्रमी आहे. टेरिफ, भूराजकीय स्थितीत होणारा बदल आणि धोरणाच्या पार्श्वभूमीवर टाटा स्टीलने चांगली कामगिरी केली आहे. कच्च्या पोलादाचे उत्पादन 12 टक्के वाढले असून वितरणात 14 टक्के वाढ पाहायला मिळाली.