टाटा स्टीलचा हरित पोलाद कारखाना
लुधियानामध्ये 3,200 कोटींच्या खर्चाचा प्रदूषणमुक्त &ंकारखाना उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा स्टीलने शुक्रवारी पंजाबच्या लुधियानामधील हाय-टेक व्हॅली येथे आपल्या पहिल्या स्क्रॅप-आधारित इलेक्ट्रिक आर्क फर्नेस सुविधेचे औपचारिक उद्घाटन केले. 3,200 कोटींचा हा प्लांट भारताच्या पोलाद उद्योगासाठी एक मैलाचा दगड असून, पर्यावरण आणि विकास यांच्यात संतुलन साधण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या सोहळ्यात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान आणि टाटा स्टीलचे सीईओ आणि एमडी टी. व्ही. नरेंद्रन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वापर
या प्लांटची वार्षिक पोलाद उत्पादन क्षमता 0.75 दशलक्ष टन आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे याचा कमी कार्बन फूटप्रिंट, जो प्रति टन पोलाद उत्पादनातून 0.3 टनांपेक्षा कमी सीओ2 उत्सर्जित करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. तसेच, ही सुविधा 100 टक्के स्टील स्क्रॅपचा वापर करेल, ज्यामुळे नैसर्गिक संसाधनांवरील ताण कमी होईल आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
चक्रीय अर्थव्यवस्था तथा आत्मनिर्भरता
टाटा स्टीलचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याला हरित औद्योगिक भविष्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हटले आहे. प्लांटसाठी आवश्यक असलेल्या स्क्रॅपपैकी 40 टक्के स्क्रॅप हरियाणातील टाटा स्टीलच्या स्वत:च्या रिसायकलिंग प्लांटमधून येईल. सीईओ टी. व्ही. नरेंद्रन यांनी यावर जोर दिला की, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहून संसाधनांचा अपव्यय टाळण्यासाठी कंपनी चक्रीय अर्थव्यवस्थेत कशी गुंतवणूक करत आहे, याचे हे युनिट एक उदाहरण आहे.
टाटा टिस्कॉनमुळे बांधकाम क्षेत्रात वाढलेली पकड
ही नवीन सुविधा बांधकाम-दर्जाचे स्टील रिबार तयार करेल, जे टाटा स्टीलचा लोकप्रिय रिटेल ब्रँड असलेल्या टाटा टिस्कॉन अंतर्गत विकले जाईल. यामुळे उत्तर भारतातील उत्पादन क्षेत्रात कंपनीचा बाजारहिस्सा आणखी मजबूत होईल. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या गुंतवणुकीचे स्वागत केले आणि पंजाबच्या औद्योगिक विकासासाठी व रोजगारासाठी हे एक शुभ चिन्ह असल्याचे म्हटले