टाटा पॉवरचा इंडियन ऑईलसोबत करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टाटा पॉवर यांनी नुकताच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. यांच्यासोबत नवा करार केला आहे. या नव्या कराराअंतर्गत 500 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे देशभरामध्ये उभारली जाणार आहेत. टाटा पॉवर सदरची इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे इंडियन ऑईलच्या रिटेल इंधन केंद्रांवर स्थापित करेल.
यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये सहकार्याचा करार करण्यात आला असून त्यावर उभयतांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळूर, अहमदाबाद, पुणे, कोची या शहरांमध्ये नवी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे होणार आहेत. या सोबतच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, सालेम-कोची महामार्ग, गुंटूर-चेन्नई महामार्ग या महामार्गांवरसुद्धा केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. फास्ट आणि सुपर फास्ट या प्रकारामध्ये चार्जिंग केंद्रे स्थापली जाणार आहेत. आयओसीएल यांना 2024 पर्यंत 10 हजार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे उभारायची आहेत. सध्याला कंपनीची 6 हजार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रे देशभरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. तर टाटा पॉवरची देशामध्ये 420 शहरांमध्ये चार्जिंग केंद्रे कार्यरत आहेत.