टाटा पॉवर करणार 20 हजार कोटीची गुंतवणूक
चेअरमन चंद्रशेखरन यांची माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
नूतनीकरण ऊर्जा निर्मितीसाठी ऊर्जा क्षेत्रातील टाटा पॉवर ही कंपनी चालू आर्थिक वर्षात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही माहिती टाटा समूहाचे चेअरमन नटराजन चंद्रशेखर यांनी दिली आहे. भागधारकांच्या 105 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. टाटा समूहातील टाटा पॉवर ही कंपनी ऊर्जा उत्पादन, वितरण कार्यात कार्यरत आहे. चंद्रशेखरन म्हणाले, आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मागच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2024 मध्ये कंपनीने 12000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. नूतनीकरण योग्य ऊर्जा निर्मितीकरीता तसेच ऊर्जा वहन व वितरण कार्यासाठी ही रक्कम प्रामुख्याने वापरली जाणार आहे.
वितरणाची व्याप्ती वाढवणार
हरित उर्जेच्या योगदानात कंपनी आपल्यापरीने योगदान देण्यासाठी नेहमीच कार्यरत असेल. ऊर्जा वितरणाचा विस्तार इतर राज्यांमध्येही करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार असून औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या उर्जेची आवश्यक ती मागणी पूर्ण करण्याकरीता कंपनी सदैव कार्यरत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.