टाटा मोटर्स घेणार आयव्हेकोमधील हिस्सेदारी
87.81 शेअर्संना पाठिंबा : टाटाने दिलेला अधिग्रहण प्रस्ताव स्वीकारला
वृत्तसंस्था, मुंबई
इटालियन ट्रक निर्मिती कंपनी आयव्हेकोला विकत घेण्याची टाटा मोटर्सची योजना एक मोठे यश ठरली आहे. आयव्हेकोच्या 87.81 टक्के शेअर्ससाठी टाटा मोटर्सने दिलेला अधिग्रहण प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. हा करार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या 80 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. यामुळे या मोठ्या कराराच्या मार्गातील एक महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
टाटा मोटर्सने आयव्हेकोला खरेदी करण्यासाठी 3.91 अब्ज युरोची ऑफर दिली आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर आयव्हेकोमधील टाटा मोटर्सचा हिस्सा 89.42 टक्क्यांपर्यंत वाढेल. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी जुलैमध्ये या अधिग्रहणाची घोषणा केली होती. तथापि, गेल्या 15 महिन्यांत कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषत: सरकारी आणि नियामक मंजुरी मिळण्यास झालेल्या विलंबामुळे हा व्यवहार वेळेवर पूर्ण होऊ शकला नाही.
भागधारकांची व्यवहाराला मंजुरी
16 ऑक्टोबर रोजी आयव्हेकोच्या भागधारकांची एक विशेष सभा झाली. सुमारे 53 टक्के भागधारकांनी व्यवहाराच्या बाजूने मतदान केले, तर 12 टक्के जणांनी याला विरोध केला. उर्वरित 35 टक्क्यांनी मतदानात भाग घेतला नाही. या सभेत एक महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. यापूर्वी, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी किमान 95 टक्के शेअर्सची अधिग्रहण ऑफर स्वीकारणे आवश्यक होते. परंतु भागधारकांनी ही मर्यादा 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे टाटा मोटर्सला आयव्हेकोला खरेदी करणे सोपे झाले.आयव्हेकोने शेअर बाजाराला सांगितले की, टेकओव्हर ऑफरच्या शेवटच्या दिवशी, 26 ऑक्टोबर रोजी, 9.70 कोटींहून अधिक शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले. यामुळे, एकूण 23.81 कोटींहून अधिक शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे एकूण ऑफरच्या सुमारे 87.81 टक्के आहे.
आता पुढे काय?
आयव्हेकोच्या म्हणण्यानुसार, टेकओव्हर ऑफरचा अंतिम निकाल 29 ऑक्टोबर रोजी शेअर बाजार उघडण्यापूर्वी जाहीर केला जाईल. यानंतर, भागधारकांना 2 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान त्यांचे समभाग विकण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
