टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहन चार्जिंग केंद्रांसाठी भागीदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने आपल्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या चार्जिंगकरता दोन कंपन्यांशी भागीदारी करण्याचे निश्चित केले आहे. चार्जिंग केंद्रांच्या उभारणी व विकासासाठी टाटा मोटर्सने डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि थंडरप्लस सोल्युशन्स यांच्यासोबत भागीदारी केली आहे.
250 नवी चार्जिंग केंद्रे
या दोन्ही कंपन्यांबरोबर टाटा मोटर्सने अलीकडेच सहकार्याचा करार केला असून त्यावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत देशभरामध्ये इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांसाठी 250 हून अधिक नवीन फास्ट चार्जिंग केंद्रे स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूर, पुणे आणि कोची समवेत 50 हून अधिक शहरांमध्ये नवी चार्जिंग केंद्रे उभारली जाणार आहेत. टाटा मोटर्स व्यावसायिक वाहनांचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख विनय पाठक यांनी सांगितले की, ज्या मार्गावर व्यावसायिक वाहनांचा वावर जास्त आहे अशा मार्गावरच शहरांमध्ये फास्ट चार्जिंग केंद्रे उभारली जाणार आहेत. यायोगे इतर इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन कंपन्यांना याचा उपयोग करून घेता येईल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त कंपन्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक व्यवसायिक वाहनांची नव्याने भर घालणे शक्य होणार आहे.