टाटा मोटर्सची 9सीटरची विंगर प्लस बाजारात लाँच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सने 9 जण बसतील अशी नवी टाटा विंगर प्लस ही गाडी भारतीय बाजारात उतरवली आहे. देशातील सर्वात मोठी व्यावसायिक कार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतात वाढलेल्या प्रवास आणि पर्यटन क्षेत्राचा विचार करून टाटा मोटर्सने ही 9 जण बसतील अशी नवी विंगर प्लस भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे. सदरच्या नव्या गाडीची किंमत 20.6 लाख रुपये (एक्स शोरूम, नवी दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या गाडीमध्ये अॅडजस्टेबल आर्मरेस्ट रिक्लाइन सीट, पर्सनल यूएसबी चार्जिंग पॉइंट, स्वतंत्रप्रमाणे एसी वेंट अशा सोयी देण्यात आलेल्या आहेत. गाडीमधील केबिन मोठ्या आकाराची असून सामान ठेवायला भरपूर जागाही आहे.
काय म्हणाले उपाध्यक्ष
विंगर प्लसच्या सादरीकरणसंदर्भात बोलताना टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष आणि कमर्शियल पॅसेंजर वाहन व्यवसायाचे प्रमुख आनंद एस. म्हणाले, सदरचे नवे वाहन हे प्रवाशांसाठी एक प्रीमियम अनुभव मिळवून देणारे असेल. विविध गोष्टींचा बारकाईने विचार करून आरामदायी अशा वाहनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. हे वाहन चालवण्यासाठी आरामदायी असून या गाडीत डायकोर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.
व्यावसायिक क्षेत्रात दबदबा
टाटा मोटर्सचा व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये दबदबा कायम राहिलेला आहे. आता याच प्रकारामध्ये कंपनीने 9 सीटरची ही नवी गाडी दाखल केलेली आहे. 9 सीटरपासून ते 55 सीटरचे वाहन कंपनीने आजपर्यंत बाजारात दाखल केलेले आहे. भारतात कंपनीची 4500 हून अधिक विक्री आणि सेवा केंद्रे कार्यरत आहेत.