टाटा मोटर्सने कमावला 7025 कोटी रुपयांचा नफा
जग्वार लँड रोव्हरमुळे नफा वाढला : 137 टक्के वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सने आपला डिसेंबरअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने सदरच्या तिमाहीत 7025 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने विविध तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही चांगला नफा पदरात पाडून घेतला आहे.
नफा वाढण्याचे कारण..
मागच्या वर्षी याच अवधीमध्ये टाटा मोटर्सने 2958 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. यंदाचा तिसऱ्या तिमाहीचा नफा जवळपास 137 टक्के अधिक असल्याची माहिती टाटा मोटर्सने दिली आहे. या नफ्यासाठी कंपनीची लक्झरी कार जग्वार लँड रोव्हरची विक्रमी विक्री हे महत्त्वाचे कारण ठरले असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीने सदरच्या तिसऱ्या तिमाहीत 25 टक्के वाढीसह 1 लाख 10 हजार 577 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. जेएलआर, टाटा व्यावसायिक वाहन, टाटा प्रवासी वाहने आणि इतर गटातील वाहनांच्या दमदार विक्रीमुळे महसुलामध्ये कंपनीला अपेक्षेपेक्षा अधिक चांगली वाढ नोंदवता आली आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने 88 हजार 489 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता.