टाटा मोटर्सचा व्यावसायिक वाहनांचा नफा 83 टक्क्यांनी मजबूत
निव्वळ नफा वाढून 2,560 कोटींच्या घरात, 20667 कोटीचा महसूल
नवी दिल्ली : टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल्स (सीव्ही) विभागाने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत, टाटा समूहाच्या या कंपनीचा निव्वळ नफा 83.3 टक्क्यांनी वाढून 2,560 कोटी रुपयांवर पोहोचला आहे; गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत हा नफा 1,397 कोटी रुपये होता.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, निव्वळ नफ्यातील ही वाढ ‘टाटा कॅपिटल लिमिटेड’मधील गुंतवणुकीवर मिळालेल्या ‘मार्क-टू-मार्केट गेन’मुळे (गुंतवणुकीच्या बाजारमूल्यातील बदलामुळे झालेला नफा) झाली आहे. महसूल 20,667 कोटी रुपयांवर पोहचला असून एकूण खर्चात 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्स ‘सीव्ही’चा कामकाजातून मिळणारा महसूल 19टक्क्यांनी वाढून 20,667 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा 17,324 कोटी रुपये होता.
एकूण खर्च वाढल्याने मार्जिनमध्ये घट: या तिमाहीत कंपनीचा इबीआयटीडीए 10 टक्क्यांनी वाढून 2,300 कोटी रुपये झाला. निव्वळ रोख रक्कम : 30 जून 2026 पर्यंत, कंपनीकडे 13,500 कोटी रुपयांची निव्वळ रोख रक्कम होती. या आकडेवारीमध्ये टीएमएफ होल्डिंग्सचे एकूण कर्ज आणि त्यातून टाटा कॅपिटल लिमिटेडमधील गुंतवणुकीचे बाजारमूल्य वजा करून केलेली जुळवणी यांचा समावेश आहे.
निर्यात: परदेशातील बाजारपेठांमध्ये पाठवल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत 35 टक्केची लक्षणीय वाढ झाली. बाजारातील हिस्सा: पहिल्या तिमाहीत भारतातील देशांतर्गत व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा 36.8 टक्के होता.