टाटाने नेक्सॉन ईव्हीची किंमत 1.20 लाखांनी केली कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्सने आपल्या दोन इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी केल्या आहेत. नेक्सॉन ईव्हीची किंमत 1.20 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे, तर टीयागो ईव्हीची किंमत ही 70,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. बॅटरीच्या किमती कमी होणार असल्याचे संकेत असून त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी किमती कमी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नेक्सॉन ईव्हीची किमत ही आता 14.49 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टीयागोचे बेस मॉडेल हे 7.99 लाख रुपयांना उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहेत. मात्र नुकत्याचा लाँच झालेल्या पंच ईव्हीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
ईव्ही बाजारात टाटाचा 70 टक्क्यांपेक्षा अधिकचा हिस्सा
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रीक मोबिलिटी लिमिटेड ही 70 टक्क्यांपेक्षा जादा शेअरसह इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमधील बाजारपेठेत आघाडीवर आहे. कंपनीने 2023 मध्ये एकूण 69,153 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली. टाटा मोर्ट्स यावर्षी व्रुवे, हॅरियर ईव्ही, सिरेरा आणि अल्ट्राझ ईव्ही लाँच करणार आहे.
बॅटरी सेलच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता
विवेक श्रीवत्स, मुख्य व्यावसायिक अधिकारी, टीपीईएम, म्हणाले: ‘बॅटरीचा खर्च हा ईव्हीच्या एकूण खर्चाचा मोठा भाग असतो. अलीकडच्या काळात बॅटरी सेलच्या किमती कमी झाल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत त्या आणखी कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत, आम्ही हा लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे. नेक्सॉन आणि टियागो या इलेक्ट्रिक मोटारी ग्राहकांच्या पसंतीस उतरु लागल्या आहेत.