टाटा ग्रुपमधील वाद : चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढला
आता 2032 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष राहणार
वृत्तसंस्था/ मुंबई
रतन टाटा यांच्या निधनानंतर ग्रुपमधील वादाच्या पार्श्वभूमीवर टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ 2032 पर्यंत वाढवण्यात आला आहे. टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच ग्रुप एक्झिक्युटिव्ह प्रमाणित निवृत्ती वयापुढे त्यांच्या पदावर राहणार आहेत.
टाटा ग्रुपच्या धोरणानुसार, एखाद्या कार्यकारी व्यक्तीने साधारणपणे 65 वर्षांच्या वयात निवृत्त व्हावे. तथापि, बिगर-कार्यकारी भूमिकेत, ते 70 वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतात. चंद्रशेखरन 63 वर्षांचे आहेत. फेब्रुवारी 2027 मध्ये त्यांचा दुसरा कार्यकाळ संपल्यानंतर ते 65 वर्षांचे होणार आहेत. आता ते 2032 मध्ये वयाच्या 70 व्या वर्षी निवृत्त होणार असल्याची माहिती आहे. चंद्रशेखरन पहिल्यांदा ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डात सामील झाले, त्यानंतर चार महिन्यांनी जानेवारी 2017 मध्ये त्यांना अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांनी 1987 मध्ये टीसीएसमध्ये इंटर्न म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.
टाटा ग्रुपमधील वाद, सरकारची दखल
ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्याच वेळी, नोव्हेंबर 2024 मध्ये नोएल यांनाही टाटा सन्सच्या बोर्डात समाविष्ट करण्यात आले. परंतु अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार हा निर्णय ट्रस्टमध्ये एकमताने झाला नव्हता. यामुळे टाटा सन्स नियंत्रित करणाऱ्या टाटा ट्रस्टमधील बोर्ड जागांचे थेट विभाजन झाले. एक गट बोर्ड सदस्य नोएल टाटा यांच्याशी आहे, तर दुसरा गट मेहली मिस्त्राr यांच्याशी आहे. मिस्त्राr यांचे कनेक्शन शापूरजी पालोनजी कुटुंबाशी आहे ज्यांचा टाटा सन्समध्ये 18.37 टक्के इतका वाटा आहे.
7 ऑक्टोबर रोजी, टाटा सन्सच्या बोर्ड सीटवरील वादाच्या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ नेतृत्वाने गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी 45 मिनिटांची बैठक घेतली. एका वृत्तानुसार, सरकारने म्हटले आहे की घरगुती वाद लवकरात लवकर मिटवावा, जेणेकरून कंपनीवर परिणाम होणार नाही. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि विश्वस्त डेरियस खंबाटा उपस्थित होते.
वादविवाद न करता निर्णय घेतले : काही विश्वस्तांचा आरोप
टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये वाढत्या संघर्षाचे प्रमुख कारण म्हणजे टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची 1,000 कोटी रुपयांची निधी योजना. नोएल टाटा 2010 पासून कंपनी चालवत आहेत. टाटा इंटरनॅशनल 27 देशांमध्ये कार्यरत आहे. विश्वस्त प्रमित झवेरी, मेहली मिस्त्राr, एच. सी. जहांगीर आणि दारायस खंबाटा यांनी टाटा ट्रस्टच्या बोर्ड बैठकीत निधी कसा पुढे ढकलला गेला, याबद्दल प्रश्न उपस्थित केले.
टाटा ग्रुपमध्ये टाटा सन्सची 66 टक्के हिस्सेदारी
टाटा ग्रुपची स्थापना जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती. ही भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे, तिच्या 10 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये असलेल्या 30 कंपन्या जगातील 100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करत आहेत. टाटा सन्स ही टाटा कंपन्यांची प्रमुख गुंतवणूक धारण करणारी आणि प्रवर्तक आहे. टाटा सन्सची 66 टक्के इक्विटी शेअर भांडवल टाटांच्या चॅरिटेबल ट्रस्टकडे आहे, जी शिक्षण, आरोग्य, कला आणि संस्कृती आणि उपजीविका निर्मितीसाठी काम करते.