टाटा-केमिकल्सच्या अध्यक्षांचा राजीनामा
एस.पद्यनाभन कंपनीचे नवीन अध्यक्ष
वृत्तसंस्था/मुंबई
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी 29 मे 2025 पासून टाटा केमिकल्सचे संचालक आणि अध्यक्षपद सोडले आहे. कंपनीने बुधवारी (28 मे) स्टॉक एक्सचेंज (बीएसई-एनएसई) ला दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली. एन चंद्रशेखरन यांच्या जागी संचालक मंडळाने विद्यमान संचालक एस. पद्मनाभन यांची टाटा केमिकल्सचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. चंद्रशेखरन यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘माझ्या सध्याच्या आणि भविष्यातील वचनबद्धतेचे काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर, मी संचालक मंडळातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा केमिकल्स संचालक मंडळाचे अध्यक्षपद भूषवणे हा माझा बहुमान आहे आणि माझ्या कार्यकाळात मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.’
मोदन साहा कंपनीचे अतिरिक्त संचालक
याव्यतिरिक्त, कंपनीने नामांकन आणि मोबदला समितीच्या शिफारशींवर आधारित मोदन साहा यांची अतिरिक्त संचालक (गैर-कार्यकारी, स्वतंत्र) म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली. या पदावरील त्यांचा कार्यकाळ 28 मे 2025 पासून लागू असेल. एन चंद्रशेखरन हे 2027 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष राहतील. एन चंद्रशेखरन टाटा ग्रुप कंपनी टीसीएसमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामील झाले. या ग्रुपचे अध्यक्ष बनणारे ते पहिले कुटुंबाबाहेरील सदस्य आहेत. 2017 मध्ये त्यांना पहिल्यांदाच टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले.
टाटा केमिकल्सची स्थापना
टाटा केमिकल्स लिमिटेड ही टाटा ग्रुपची एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी रसायने, पीक संरक्षण आणि विशेष रसायन उत्पादने तयार करण्याचे काम करते.