टाटा कॅपिटलचा आयपीओ पुढील महिन्यात येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा समूहातील कंपनी टाटा कॅपिटल यांचा बहुप्रतिक्षीत आयपीओ पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भातल्या तयारीला कंपनीने जोर दिला असल्याचे समजते. सादर होणाऱ्या या कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चौथ्या क्रमांकाचा आयपीओ आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये आयपीओ बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो, असे म्हटले जात असून या आयपीओअंतर्गत कंपनी 17000 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. टाटा सन्स यांची जवळपास 80 टक्के इतकी हिस्सेदारी या कंपनीमध्ये आहे. आयपीओ जर का सादर झाला तर तो दुसरा सर्वात मोठा आयपीओ मूल्याच्या तुलनेमध्ये ठरणार आहे. याआधी ह्युंडाई मोटर इंडिया यांचा आयपीओ 27 हजार 870 कोटी रुपयांचा मागच्या वर्षी सादर करण्यात आला होता. ह्युंडाईच्या आधी एलआयसी (20,550 कोटी रुपये) व वन 97 कम्युनिकेशन्स (18300 कोटी रुपये) यांनीही आपले आयपीओ बाजारात आणले होते.
ऑगस्टमध्ये कंपनीने नवी कागदपत्रे सेबीकडे दाखल केली असून त्याअंतर्गत पाहता 21 कोटी ताजे समभाग विक्रीकरता उपलब्ध करणार असल्याचे समजते. तर 26.58 कोटी ऑफर फॉर सेलअंतर्गत समभाग सादर केले जाणार आहेत. आयपीओअंतर्गत समभागाची इशु किंमत 350-380 रुपये प्रति समभाग ठेवली जाण्याची शक्यता आहे.