टाटा कॅपिटल सेबीकडे सुधारीत ड्राफ्ट पेपर्स देणार
15,000 कोटी रुपयांची उभारणीची योजना
वृत्तसंस्था/ मुंबई
टाटा समूहाची वित्तीय सेवा कंपनी टाटा कॅपिटल आयपीओची तयारी करत आहे. कंपनी लवकरच बाजारातील नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) म्हणजेच ड्राफ्ट पेपर्स दाखल करणार आहे. या बातमीनंतर, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये ट्रेडिंग दरम्यान 6 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. तथापि, कंपनीचा शेअर सध्या 4.23 टक्क्यांच्या वाढीसह 6,818 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या 6 महिन्यात कंपनीचा शेअर 11 टक्के आणि एका वर्षात 9 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा बाजार 34.52 हजार कोटी रुपयांचा आहे.
गुंतवणूकदारांच्या वाढत्या अपेक्षा
गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे कारण म्हणजे टाटा कॅपिटलच्या आयपीओबद्दलच्या अपेक्षा वाढत्या आहेत. बाजाराचा असा विश्वास आहे की या आयपीओमुळे टाटा समूहाच्या वित्तीय सेवा कंपन्यांचे मूल्य वाढेल आणि सूचीबद्ध वित्तीय सेवा क्षेत्रात समूहाची उपस्थिती आणखी मजबूत होईल.कंपनी आयपीओमधून 15 हजार कोटी उभारणार आहे. एका वृत्तानुसार, टाटा कॅपिटलच्या आयपीओमध्ये टाटा सन्स त्यांचे 23 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) मध्ये विकतील, तर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन 3.58 कोटी शेअर्स विकेल. याशिवाय, कंपनी 21 कोटी नवीन शेअर्स जारी करण्याची योजना आखत आहे.
कंपनीने 4 महिन्यांपूर्वी आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते. टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या आयपीओसाठी सेबीकडे हे प्री-फायलिंग गोपनीय होते. गोपनीय प्री-फायलिंग मार्ग नोव्हेंबर 2022 मध्ये सेबीने सुरू केला होता. या अंतर्गत, कंपन्यांना त्यांचे आवश्यक व्यवसाय तपशील सार्वजनिक न करता त्यांचे डीआरएचपी दाखल करण्यास मदत केली जाते. टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सची सुमारे 93 टक्के हिस्सेदारी आहे
लिस्टिंगसाठी 10 गुंतवणूक बँकांची नियुक्ती
टाटा कॅपिटलने लिस्टिंगसाठी 10 गुंतवणूक बँकांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या बँकांमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी, जेपी मॉर्गन, अॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचएसबीसी सिक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल, बीएनपी परिबा, एसबीआय कॅपिटल आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे.