तस्लिमा 19 वर्षांनंतर परतल्या कोलकात्यात
बांगलादेशात परतणे अशक्य असल्याची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था
कोलकाता
लेखिका तस्लिमा नसरीन 18 वर्षे, 8 महिने आणि 10 दिवसांनंतर कोलकाताला परतल्या आहेत. लाल काठाची पांढरी साडी नेसून तस्लिमा यांनी सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. शनिवार, 1 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील रवींद्र सदनात त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उस्मान घनी मल्लिक यांच्या सेक्युलर मिशनतर्फे करण्यात येत आहे. यात बांगलादेशी लेखकही सहभागी होणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी तस्लिमा यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
तस्लिमा नसरीन यांना 8 ऑगस्ट 1994 रोजी बांगलादेश सोडावा लागला होता. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांना पश्चिम बंगालमधून हद्दपार करण्यात आले. 2011 नंतर तस्लिमा यांना दिल्लीत कायमस्वरूपी रहिवासी दर्जा मिळाला असला तरी, पश्चिम बंगालशी असलेले त्यांचे आध्यात्मिक नाते कायम राहिले. आपल्या कोलकाता भेटीवेळी त्यांनी भूतकाळातील आठवणींना उजाळा देत बांगलादेशात परतणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारचे आभार मानत जे दार एकेकाळी बंद होते, ते अखेर उघडले असल्याचे स्पष्ट केले. मला वाटते की हे दार उघडेच राहावे, जेणेकरून जेव्हा मला वाटेल तेव्हा मी इथे येऊन बंगालची मोकळी आणि मुक्त हवा श्वासात घेऊ शकेन, असे साहित्यिक वक्तव्यही त्यांनी केले आहे.