वीज चोरी रोखण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना : जॉर्ज
बेळगाव : राज्यातील वीज चोरी व गैरवापर रोखण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना केली आहे. जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांच्या पथकांची तैनात करण्यात आली असून टास्कफोर्स व जिल्हास्तरीय पथक समन्वयाने काम करून वीज चोरीला आळा घातला जाणार आहे. वीज चोरी प्रकरणी टास्कफोर्सने अनेक गुन्हे नोंदविले असून त्यांची चौकशी करून संबंधितांकडून दंडही आकारला जात आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी दिली. प्रश्नोत्तर तासात सुरज रेवण्णा यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. वीज चोरी व गैरवापराच्या घटना रोखण्यासाठी टास्कफोर्स वेळोवेळी छापा टाकून तपासणी करत आहे. वीजचोरी आढळल्यास स्थानिक वीज पुरवठा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधितांची वीज खंडित केली जात आहे. शिवाय गुन्हाही दाखल केला जात आहे. प्रत्येक पोलीसस्थानक स्तरावर पथके स्थापन करण्यात आली आहेत यामुळे वीजचोरी व गैरवापर रोखण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येत आहेत, असेही मंत्री के. जे. जॉर्ज यांनी सांगितले.