तासगाव, कवठेमहांकाळच्या पाणीप्रश्नासाठी रोहित पाटील आक्रमक!
पाटबंधारे कार्यालयात तीन तास ठिय्या, अधिकारी धारेवर
सांगली प्रतिनिधी
पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याने तासगाव, कवठेमहांकाळचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अधिकाऱ्यांना विनंती करूनही ऐकत नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी शुक्रवारी पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात सुमारे तीन तास ठिय्या मारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तरीही पाणी न सोडल्यास प्रसंगी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ताकारी म्हैसाळ आणि टेंभू योजनांची आवर्तने सुरू आहेत. पण तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला असूनही पाणी सोडले जात नाही. म्हैसाळ योजनेच्या अधिकारी तर तोंड बघून पाणी सोडत असल्dयाचा आरोप शेतकऱ्यांमधून सुरू आहे. याबद्दल पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांशी अनेकवेळा संपर्क साधला पण अधीक्षक अभियंता दाद देत नाहीत. राजकीय दबावाखाली पाणी सोडण्यात येत असल्याची भावना दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसह नेत्यांचीही बनली आहे.
यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील आक्रमक झाले. शेकडो शेतकऱ्यांना बरोबर घेत रोहित पाटलांनी थेट सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. हजारो शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाकडे पाण्यासाठी पैसे देखील भरलेले आहेत. तरीही तासगाव, कवठेमहाकांळ तालुक्याला पाणी का देत नाही असा सवाल रोहित पाटील यांनी केला. त्यावर पाटबंधारे अधिक्षक अभियंता पाटोळे यांनी वेळकाढूपणाची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार करत त्यांना निरूत्तर केले. टेंभू आणि म्हैसाळ योजनेच्या कार्यकारी अभियंत्यावरही प्रश्नांचा भडीमार केला.
रोहित पाटील पाण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांसह वारणालीमधील पाटबंधारे कार्यालयात आल्याचे समजताच काँग्रेस नेते विशाल पाटीलही कार्यकर्त्यासह वारणालीमध्ये पोहोचले. विशाल पाटील व रोहीत पाटलांनी अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या मारला. त्यांना सुमारे दोन ते तीन तास कार्यालयातच घेराओ घातला. तासगाव कवठेमंकाळला पाणी दिल्याशिवाय आम्ही हलणार नाही, अशी भुमिका घेत ठिय्या मारला.
राजकीय हेतूने जनतेला पाण्यासाठी त्रास
राजकीय हेतूने तासगाव, कवठेमहांकाळला पाणी सोडले जात नाही, असा आरोप करत राजकारणासाठी भिषण दुष्काळात लोकांना त्रास देऊ नका. आम्ही ते खपवून घेणार नाही असा इशारा रोहित पाटील यांनी दिला. आम्ही संयमाने लोकांना त्रास होऊ नये यासाठी कार्यालयात आलो आहोत. पाटबंधारेच्या कारभारात लवकर सुधारणा झाली नाही, तर पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा रोहित पाटील आणि विशाल पाटील यांनी दिला.
पालकमंत्री जिल्ह्याचे की मिरजेचे
यावेळी रोहित पाटील यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावरही जोरदार टिका केली. पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन नाही. केवळ राजकीय सोयीतून आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडलं जात आहे, पालकमंत्री सुरेश खाडे हे एका तालुक्याचे नाहीत तर त्यांनी जिल्ह्याच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अशी टिका रोहित पाटील यांनी केली. यावेळी दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.