Sangli News: मोटारसायकल घसल्याने अपघात, बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, भाऊ जखमी
पंचायत समिती येथे अपघात, कामानिमित्त येताना काळाचा घाला
तासगाव : तासगांव-मणेराजुरी रोडवर वासुंबे गावच्या हद्दीत मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात तरुणी ठार झाली. रिना रावसाहेब सरवदे (वय 20, रा. गव्हाण, ता. तासगांव) असे त्या तरुणीचे नाव आहे. तर तिचा चुलतभाऊ सौरभ बाबासाहेब सरवदे (रा. गव्हाण, ता. तासगांव) हा जखमी झाला. पंचायत समिती येथे कामानिमित्त येत असताना हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रिना आणि तिचा भाऊ सौरभ हे 7 जून रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान एन. के. कंपनीच्या इलेक्ट्रीक मोटारसायकलवरून गव्हाण येथून मणेराजुरी-तासगांव रोडने तासगांव येथे येत होते.
यावेळी रिना मोटारसायकल चालवित होती. तर सौरभ मागे बसला होता. वासुंबे गावच्या हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिराजवळ ते आले असता अचानक रिनाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. यामुळे मोटारसायकल रस्त्याच्या डाव्या बाजुला असणाऱ्या साईडपट्टीवर जाऊन वेडी-वाकडी झाली.
त्यावेळी रिना मोटारसायकल पुन्हा रस्त्यावर घेताना, गाडी स्लिप होऊन ते सिमेंट कॉक्रिंटच्या रोडवर पडले. त्यावेळी सौरभच्या उजव्या पायास आणि डाव्या हातास किरकोळ जखम झाली. तर रिनाचे डोके सिमेंट क्रॉक्रिंटच्या रोडवर जोराद आदळल्याने ती गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली.
जखमी अवस्थेत रिनाला तासगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी सुरू रात्री 12.46 वाजता रिनाची प्राणज्योत मालवली. या अपघाताला स्वत: रिना सरवदे कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपघाताचे वृत्त समजताच पो.हे.कॉ.सचिन जोंजाळ, पो.कॉ.समीर आवळे यांनी धाव घेतली.
...तत्पूर्वीच काळाचा घाला
रिना सरवदे या तासगांव पंचायत समिती येथे कामानिमित्त मोटारसायकलवरून चालल्या होत्या. मात्र पंचायत समिती येथे पोहचण्यापूर्वीच काळाने हा घाला घातल्याने गरीब कुटुंबातील रिनाच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.