तरुण तेजपालला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा; सर्वोच्च न्यायालयात अपील करणार
पणजी : 'तेहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल याला २०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर तेजपाल याने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे स्पष्ट केले.
हे प्रकरण २०१३ मध्ये एका महिला सहकाऱ्यावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराशी संबंधित असून, त्याची देशभरात मोठी चर्चा झाली होती. न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने तरुण तेजपाल यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एफ), ३५४(अ) आणि ३५४(ब) अंतर्गत दोषी ठरवले. या कलमांमध्ये विश्वासाच्या किंवा अधिकाराच्या स्थानाचा गैरवापर करून बलात्कार, लैंगिक छळ तसेच महिलेचे कपडे काढण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा बळाचा वापर यांचा समावेश आहे.
शिक्षेनंतर प्रतिक्रिया देताना तरुण तेजपाल म्हणाला की, "आम्ही निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत. आमच्याविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. खटल्यात आम्ही साडेसात वर्षे लढा दिला आणि खालच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळाली होती. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सर्व पुरावे सादर करू."
दरम्यान, या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय "न्यायाचा विजय" असल्याचे म्हटले. "ही घटना गोव्यात घडल्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करणे ही गोवा पोलिस आणि राज्य सरकारची जबाबदारी होती. आमच्या सरकारने हा खटला अत्यंत गांभीर्याने हाताळला आणि अखेर न्यायालयाचा निर्णय आला," असे त्यांनी सांगितले.