For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा मुक्तीलढ्यात तरुण भारतचे बहुमूल्य योगदान!

12:24 PM Jun 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोवा मुक्तीलढ्यात तरुण भारतचे बहुमूल्य योगदान
Advertisement

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे गौरवोद्गार : क्रांतिदिन सोहळ्यात डॉ. किरण ठाकुर यांचा सन्मान

Advertisement

पणजी : गोवा मुक्तीनंतरही गोव्याशी कायम नाते ठेवलेल्या दै. तरुण भारतने गोवा मुक्तीसंग्रामात बहुमूल्य योगदान दिले आहे. त्याची दखल गोवा सरकारने घेतली आहे. या योगदानाची परतफेड करणे शक्य नसले तरी केवळ एक पोचपावती म्हणून आज क्रांतिदिन कार्यक्रमात तरुण भारतचा सन्मानपत्राने सन्मान करण्यात येत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. दैनिक तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी हा सन्मान स्वीकारला. गोवा क्रांतिदिनानिमित्त पणजीत आझाद मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव डॉ. व्ही कंदवेलू, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास (दाद) देसाई यांची उपस्थिती होती.

दैनिक केसरीचाही सन्मान

Advertisement

दै. तरुण भारत प्रमाणेच गोवा मुक्तीसाठी पुणे येथून कार्यरत ‘केसरी’ या दैनिकानेही महान योगदान दिले आहे. त्याही योगदानाची पोचपावती म्हणून थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पाचव्या पिढीतील सदस्य तथा विद्यमान संपादक रोहित टिळक यांचाही आम्ही गौरव करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वातंत्र्यसैनिकांचा केला गौरव

अशाप्रकारे प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचा त्याग आणि बलिदानाचे आपल्या सरकारने कायम स्मरण ठेवले आहे. त्यातून आपल्या कार्यकाळात गोवा स्वातंत्र्यलढ्याशी  संबंधित देशभरातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचा शोध घेऊन त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्याचे कार्य हाती घेण्यात आले.

अनेकांना दिला ‘गार्ड ऑफ हॉनर’

गोवा स्वातंत्र्य लढ्यातील पहिले हुतात्मा बाळा राया मापारी यांचा मरणोत्तर सन्मान म्हणून अस्नोडा येथे स्मारक उभारण्यात आले आहे. हेही काम आपल्याच सरकारने केले. दीपाजी राणे यांचे बंड, कुंकळ्ळीतील बंड, पिंटोज बंड यातील सहभागी सर्वांना ‘गार्ड ऑफ हॉनर’ देण्याचे काम विद्यमान सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. याचा अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना दिल्या नोकऱ्या

हे कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित न ठेवता गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत सामावून घेण्यात येत आहे. गेल्या सात वर्षांपासून हे कार्य सुरू असून आतापर्यंत 288 जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, तर आजच्या कार्यक्रमात आणखी 22 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात येत आहेत. आता केवळ 30 ते 40 जण शिल्लक राहिले असून त्यांनाही पुढील वर्षभरात सरकारी नोकरीत सामावून घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

आम्ही इतिहास विसरलेलो नाही

स्वातंत्र्यसैनिकांसाठी हे कार्य करण्यामागील हेतू म्हणजे आम्ही इतिहास विसरलेलो नाही. स्वातंत्र्यसैनिकांचे राष्ट्रप्रेम आणि बलिदान विसरलेलो नाही. आपणही तो कायम स्मरणात ठेवावा. कारण इतिहासातूनच भावी पिढ्यांना गत घटनांची माहिती मिळते व त्यातून पुढील आदर्श पिढी घडते, असे त्यांनी नमूद केले.

पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे बांधकाम पूर्ण

पत्रादेवी येथील ‘हुतात्मा स्मारका’चे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. हे स्मारक प्रत्येक हुतात्म्याच्या सन्मानार्थ उभारण्यात आले आहे. त्यातून त्यांच्या धैर्याची, त्यागाची आणि गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची व दिलेल्या बलिदानाची कायमस्वरूपी साक्ष ठरेल आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मोदी सरकारचे गोव्याला संपूर्ण पाठबळ

गोवा मुक्तीनंतर ज्या गतीने राज्याचा विकास होणे आवश्यक होते तसा तो झाला नाही. 2014 नंतरच त्या विकासाला गती मिळाली. त्यातून असंख्य साधनसुविधा निर्माण करण्यात यश आले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे संपूर्ण पाठबळ आणि आर्थिक सहकार्य मिळाल्यामुळेच हे शक्य झाले, असेही ते म्हणाले. गोव्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली असून, पुढील 50 वर्षांसाठी उच्च शिक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने पाच नवीन महाविद्यालये उभारली जात आहेत. ही महाविद्यालये कायदा, फॉरेन्सिक सायन्स, कौशल्य-आधारित अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण आणि अनुभवाधिष्ठित शिक्षण यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करतील. भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना सक्षम करणे आणि त्याच वेळी राज्यातील उच्च शिक्षण परिसंस्था अधिक समृद्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

गोव्याला भारताची पर्यटन राजधानी बनविणार

पर्यटनाला चालना देऊन येथील पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. त्याद्वारे पर्यटन उद्योगाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला आधार देण्यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणे व पर्यायाने देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान अधिक बळकट करणे हा उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

Advertisement
Tags :

.