सावंतवाडी शहरात गव्यांचा धुमाकूळ
दीड तासांच्या थरारक मोहिमेनंतर कळप परतवला
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गव्यांचा कळप भरवस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अचानक रस्त्यावर गवारेडे दिसताच वाहनचालकांची भंबेरी उडाली.तर पादचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. सुमारे दीड तास चाललेल्या वनविभागाच्या विशेष मोहिमेनंतर हा कळप पुन्हा नरेंद्र डोंगराच्या दिशेने परतवण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. सायंकाळी सातच्या सुमारास नरेंद्र डोंगरावरून गव्यांचा कळप खाली उतरला. काही वेळातच हा कळप सालईवाडा परिसरात, वनविभागाच्या कार्यालयाजवळील भरवस्तीत शिरला. रस्त्यावर अचानक समोर गवारेडे आल्याने वाहनचालकांनी घाईघाईने आपली वाहने थांबवली. काही ठिकाणी किरकोळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनोद सावंत यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वाढत्या धोक्याची जाणीव होताच वनविभागाचे अधिकारी श्री.चाटे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.वनविभागाच्या पथकाने सर्वप्रथम परिसरातील वाहतूक पूर्णपणे थांबवली. नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले.त्यानंतर गव्यांना कोणीतीही ही इजा न होता पुन्हा जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.या मोहिमेत भावेश नाईक, प्रवीण मोरजकर, शेखर नाईक,अमित अरवारी, प्रसाद सावंत, विनोद सावंत तसेच वनविभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
नागरिकांत भीतीचे वातावरण
घटने दरम्यान परिसरातील नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद केले होते. “अचानक रस्त्यावर गवारेडे दिसल्याने क्षणभर काय करावे हेच सुचले नाही. अशा घटना वारंवार घडत असल्याने भीती कायम आहे,” असे एका स्थानिक नागरिकांनी सांगितले.
वाहतूक ठप्प झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.