For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुण भारत सेमी फायनल निवडणूक २४ नोव्हेंबर २०२३

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
तरुण भारत सेमी फायनल निवडणूक २४ नोव्हेंबर २०२३
Advertisement

5 मिनिटांत सरळ केले असते!

Advertisement

हैदराबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला धमकाविल्याप्रकरणी अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. हा प्रकार जर आसाममध्ये घडला असता तर 5 मिनिटात सूतासारखे सरळ केले असते असे शर्मा यांनी म्हटले आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात पोलीस निरीक्षकाला धमकाविल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिकारी प्रचारादरम्यान आचारसंहितेचे पालन करण्याची सूचना करत असताना ओवैसी यांनी जाहीरपणे धमकाविले होते.ओवैसी यांनी हा प्रकार आसाममध्ये केला असता तर केवळ 5 मिनिटांत यावर कारवाई करण्यात आली असती. तेलंगणात तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बीआरएस तसेच काँग्रेस याविरोधात मूग गिळून गप्प बसले आहेत. जर पोलिसांनाच उघडपणे धमकाविले जात असेल तर लोकांनाही धोका जाणवत असणार असे शर्मा यांनी म्हटले आहे.

राजस्थानात नाही सत्ताविरोधी भावना : अशोक गेहलोत यांचा दावा

Advertisement

राजस्थानमधील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यानी भाजपवर टीका केली आहे. राज्यातील 1 कोटी कुटुंबांपर्यंत 7 गॅरंटी पोहोचल्या आहेत. मिस कॉलद्वारे गॅरंटींसाठी नोंदणी झाली आहे. तर दुसरीकडे भाजप येथील सरकार पाडू शकण्यास अपयशी ठरल्याने अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येथे तळ ठोकून आहेत. परंतु 25 नोव्हेंबरनंतर येथे कुणीच दिसून येणार नाही. भाजप छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करू इच्छित होता, याचमुळे महादेव अॅप नावाने घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. परंतु यात भाजप स्वत:च अडचणीत आला आहे. महादेव अॅपप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी अशी मागणी गेहलोत यांनी केली आहे.

राजस्थानात लाल डायरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु लाल डायरी तर ईडी आणि सीबीआयकडे आहे. आम्ही राज्य सरकारच्या योजनांद्वारे प्रचार केला. भाजप केवळ चिथावणीयुक्त भाषेचा वापर करत आहे. राज्यात तणाव निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कन्हैयालाल यांचे मारेकरी भाजपशी संबंधित होते. राजस्थानात कुठल्याही प्रकारे प्रस्थापितविरोधी भावना नसल्याचा दावा गेहलोत यांनी केला आहे. राजस्थानात आम्ही पुन्हा सत्तेवर येणार आहोत. काँग्रेसच्या घोषणापत्रामुळे राज्यातील जनता उत्साहित आहे. तर भाजपच्या घोषणापत्रामुळे जनतेची निराशा झाली आहे. जनताच भाजपला धडा शिकविणर आहे. भाजप राजेश पायलटांचा उल्लेख करून गुर्जर समुदायाला भडकवू पाहत आहे. भाजपच्या शासनकाळात 22 वेळा झालेल्या गोळीबारात 72 गुर्जर मारले गेले होते. माझ्या शासनकाळात कधी लाठीमार देखील झालेला नाही असा दावा गेहलोत यांनी केला आहे.

गेहलोत यांचीच गॅरंटी नाही: अमित शाह

राजस्थान सरकारवर बरसले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारवर गुरुवारी निशाणा साधला आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे. राजस्थानात पुढील सरकार भाजपचेच असेल हे मी पूर्ण विश्वासाने सांगत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरण आणि घराणेशाहीचे राजकारण केले आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाला मोठे नुकसान पोहोचले आहे. मागील 6 महिन्यांपासून मी राजस्थानात फिरत असून अशोक गेहलोत सरकारचे अपयश ठळकपणे दिसून आले आहे. राजस्थानात भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. राजस्थानने नेहमीच नरेंद्र मोदींच्या मागे उभे राहत भाजपचे समर्थन केले आहे. या विधानसभा निवडणुकीत देखील राजस्थानचे लोक भाजपला साथ देतील आणि काँग्रेसला सत्तेवरून दूर करणार असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.

राजस्थानला चांगला मुख्यमंत्री देऊ

अधिक कोण कुचकामी आहे हे ठरविण्यासाठी काँग्रेस पक्षात सध्या लढाई सुरू आहे. राजस्थानात पुढील सरकार भाजपचेच असणार आहे. जनतेने काँग्रेसला निरोप देण्याचा निश्चय केला आहे. मोदींकडून राजस्थानला चांगला मुख्यमंत्री दिला जाणार असल्याचे वक्तव्य शाह यांनी केला आहे.

लाल डायरी भ्रष्टाचाराचे प्रतीक

लाल डायरी राजस्थानात भ्रष्टाचाराचे प्रतीक ठरली आहे. सर्व लोक काँग्रेस सरकारमुळे त्रस्त झाले आहेत. राज्यात पेपर लीक माफिया सक्रीय असून काँग्रेसच्या 5 वर्षांच्या शासनकाळात अनेक घोटाळे झाले आहेत. गेहलोत यांचीच स्वत:ची  गॅरंटी आहे, मग ते इतरांना कोणती गॅरंटी देणार. अशोक गेहलोत यांचा आता पुत्र वैभव यांना मुख्यमंत्री करणे हाच एकमेव अजेंडा असल्याची टीका शाह यांनी केली आहे.

दंगलखोरांवर होत नाही कारवाई

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हत्या करणाऱ्यांवरही कारवाई झालेली नाही. मतपेढीच्या राजकारणामुळे दंगलखोरांना मोकाट सोडले जात आहे. राजस्थान सरकारच्या कामाचा हिशेब मिळत नाही. राजस्थानात मागील 5 वर्षांमध्ये महिला आणि दलितांची स्थिती अधिक खराब झाल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशात राम मंदिरापेक्षा मोठा मुद्दा असूच शकत नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात राम मंदिराची चर्चा होत आहे. राम मंदिर उभारणी, कलम 370 हटविणे आणि तिहेरी तलाक विरोधी कायद्याचे काम भाजपने केले आहे. धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला भाजप विरोध करणार असल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.

काँग्रेसमध्ये सचिन पायलट एकाकी : मोदी

काँग्रेसच्या अंतर्ग कलहाचा केला उल्लेख

काँग्रेसने नेहमीच खोटी आश्वासने दिली आहे. तर दुसरीकडे मोदीची गॅरंटी आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारला हटविण्याची आणि विकासासाठी भाजपची निवड करण्याची वेळ आता आली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानातील प्रचारसभेत बोलताना म्हटले आहे.  मोदींनी देवगढ येथील सभेला संबोधित करताना सचिन पायलट यांचे नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वत:समोर इतरांना तुच्छ लेखतात. गुर्जर समुदायाशी संबंधित सचिन पायलट यांना मागील निवडणुकीतील विजयानंतर दूधातून माशी दूर करण्याप्रमाणे बाजूला सारण्यात आल्याची टीका मोदींनी केली आहे. काँग्रेसने प्रथम गुर्जर समुदायाचे नेते राजेश पायलट यांच अपमान केला आणि आता त्यांचे पुत्र सचिन यांनाही अशाचप्रकारची वागणूक दिली जात असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. काँग्रेसने जल, थल, नभ सर्वत्र केवळ भ्रष्टाचारच केला आहे. 2014 पूर्वी केवळ भ्रष्टाचारच व्हायचा. भाजप केंद्रात सत्तेवर आला नसता तर तेजससारखे लढाऊ विमान कधीच देशाच्या जवानांना मिळाले नसते असा दावा मोदींनी केला आहे. जनतेला आता राजस्थानात काँग्रेसला सत्तेवरून दूर करावे लागणार आहे आणि महिलांचा अपमान संपविण्यासाठी भाजपला सत्तेवर आणावे लागणार आहे. काँग्रेसने राजस्थानला गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचविले आहे. परंतु भाजप राजस्थानला गुंतवणुकीत अग्रस्थान मिळवून देणार आहे. काँग्रेसने राजस्थानला भ्रष्टाचार आणि पेपर लीकमध्ये टॉपवर पोहोचविले. तर दुसरीकडे भाजप राजस्थानला उद्योग, शिक्षण आणि क्रीडाक्षेत्रात अग्रस्थान मिळवून देणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

काँग्रेसला ‘ऑपरेशन कमळ’ची भीती

मध्यप्रदेशातील सर्व उमेदवारांना घ्यावी लागणार शपथ

मध्यप्रदेश काँग्रेसला आतापासूनच ‘ऑपरेशन कमळ’ची भीती सतावू लागली आहे. अशा स्थितीत काँग्रेस 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होण्यापूर्वीच स्वत:च्या उमेदवारांना खरी निष्ठा, प्रामाणिकपणा अणि पक्ष न सोडण्याची शपथ देणार आहे. भोपाळ येथील पक्षाच्या कार्यालयात उमेदवारांना ही शपथ घ्यायला लागणार आहे. त्यादिवशी काँग्रेसने स्वत:च्या सर्व उमेदवारांना मतमोजणीशी निगडित प्रशिक्षणासाठी भोपाळमध्ये पाचारण केले आहे. निवडून आलेले उमेदवार कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये याकरता काँग्रेस आतापासूनच सतर्क आहे.

वरिष्ठ नेत्यांची असणार नजर

याचबरोबर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सर्व उमेदवारांवर नजर ठेवणार आहेत. विभागनिहाय स्वरुपात वरिष्ठ नेत्यांना याकरता जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास ऑपरेशन कमळ होण्याची चर्चा जोरदार सुरू होती, काही काळानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. यामुळे काँग्रेसला मध्यप्रदेशातील सत्ता गमवावी लागली होती.

सर्व उमेदवारांच्या संपर्कात

दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पिले जाते असे काँग्रेस घोषणापत्र समितीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. मागील वेळी पुरेसा संवाद नसल्याने चुका घडल्या होत्या. परंतु यावेळी सर्व वरिष्ठ नेते उमेदवारांच्या संपर्कात आहेत. चुका होण्याची शक्यताच ठेवलेली नाही. काँग्रेसमध्ये कमलनाथ हेच सर्वात वरिष्ठ नेते आहेत. यामुळे मागील वेळेसारखी यंदा स्थिती उद्भवणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अझहरुद्दीन विरोधात केसीआर-ओवैसींचा चक्रव्यूह

तेलंगणातील ज्युबली हिल्स मतदारसंघ चर्चेत

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन हे हैदराबादच्या ज्युबली हिल्स मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील प्रचाराकरता अझहरुद्दीन यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. अझहरुद्दीन यांनी यापूर्वी पहिली निवडणूक उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद तर दुसऱ्यांदा राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूर येथून लढविली होती. अझहरुद्दीन हे पहिल्यांदाच स्वत:च्या राज्यात निवडणूक लढवत असल्याने ज्युबली हिल्स हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

ज्युबली हिल्समध्ये अझहरुद्दीन यांच्यासमोर बीआरएसचे वर्तमान आमदार मगंती गोपीनाथ आणि एआयएमआयएमचे उमेदवार मोहम्मद राशेद फराजुद्दीन यांचे आहे. अझहरुद्दीन यांच्या विरोधात बीआरएस आणि एआयएमआयएमने उमेदवार उभे करत आव्हान तीव्र केले आहे. 2018 च्या निवडणुकीत एआयएमआयएमने ज्युबली हिल्समध्ये स्वत:चा उमेदवार उभा केला नव्हता. ओवैसी यांचा पक्ष ज्युबली विल्समध्ये केवळ मुस्लीम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी यावेळी मैदानात उतरला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

ज्युबली हिल्समध्ये 3.55 लाख मतदार आहेत. तर प्रत्येकी तीन पैकी एक मतदार मुस्लीम आहे. मुस्लीम मते एआयएमआयएम आणि काँग्रेस यांच्यात विभागली गेल्यास केवळ बीआरएसला लाभ होणार आहे. एआयएमआयएमने बीआरएसच्या ताब्यातील मतदारसंघात स्वत:चा उमेदवार उभा केला असला तरीही खरे लक्ष्य अझहरुद्दीन असल्याचे स्पष्ट आहे. ज्युबली हिल्सवरून बीआरएसची अस्वस्थता दिसून येत आहे, याचमुळे एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची मदत बीआरएस घेत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

75 टक्के मतदारांवर लक्ष

अझहरुद्दीन हे स्वत:च्या प्रचारात ज्युबली हिल्समधील रस्ते आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर भर देत आहेत. ज्युबली हिल्स हा उच्चभ्रूंचा मतदारसंघ असला तरीही येथे रस्ते आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांची स्थिती बरी नसल्याचे ते सांगत आहेत. या मतदारसंघातील 75 टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत असून काँग्रेस त्यांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. खुले नाले आणि बेरोजगारी, जमिनीवर कब्जा आणि अमली पदार्थांच्या तस्करी यासाख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत बीआरएसने केवळ 25 टक्के मतदारांसाठी काम केले असल्याचा दावा अझहरुद्दीन यांनी केला आहे. काँग्रेसने रियल इस्टेट उद्योजक नवीन यादव यांना स्वत:चा अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घ्यायला लावत अझहरुद्दीन यांच्यासाठीचा मार्ग सोपा करण्याचा प्रयत्न कला अहे. यादव यांनी मागील निवडणुकीत 18 हजारांहून अधिक मते मिळवील होती.

विरोधकांकडून अझहरुद्दीन लक्ष्य

अझहरुद्दीन हे पूर्वी कमी बोलणारे व्यक्ती होते, परंतु आता ते सार्वजनिक ठिकाणी अधिक आक्रमक दिसून येत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे विरोधक हे अझहरुद्दीन यांनी मुरादाबादचे खासदार म्हणून चांगली कामगिरी केली नसल्याकडे लक्ष वेधत आहेत. तसेच हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते अपयशी ठरल्याचा दावा बीआरएसकडून केला जात आहे. अझहरुद्दीन यांना काँग्रेसची मतपेढी आणि स्वत:च्या वैयक्तिक प्रतिमेच्या मदतीने ज्युबली हिल्स मतदारसंघात विजय मिळणार अशी आशा आहे.

Advertisement
Tags :

.