For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुण भारत सेमी फायनल निवडणूक २०२३

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
तरुण भारत सेमी फायनल निवडणूक २०२३
Advertisement

हम साथ-साथ है : गेहलोत-पायलटांसोबत राहुल गांधींचा प्रचार

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राजस्थानात प्रचार केला आहे. राहुल गांधी यांनी राजस्थानात काँग्रेस एकजूट असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. राहुल यांच्या जयपूर येथील सभेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नेते सचिन पायलट हे एकत्र दिसून आले. आम्ही केवळ एकत्र दिसून येत नसून एकजूट देखील आहोत. आम्ही एकत्र राहू आणि काँग्रेस राजस्थानात विजयी होईल असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत. गेहलोत आणि पायलट यांच्यात वाद नसल्याचा संदेश जनतेला देण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्व करतेय.

Advertisement

प्रचारादरम्यान दिसून आले मतभेद

पक्षाच्या नेत्यांमध्ये कुठलेच मतभेद नसून एकजुटतेसह निवडणूक लढविली जात असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्व करत आहे. परंतु गेहलोत आणि पायलट यांच्यामधील वाद मिटला नसल्याचे दिसून आले. गेहलोत यांनी आपण मुख्यमंत्रिपद सोडू इच्छितो, परंतु ही खुर्ची मला सोडत नसल्याचे म्हटले. सोनिया गांधी यांनीच मला मुख्यमंत्री केले होते. पक्षनेतृत्वाने माझ्यावर  विश्वास दाखविला यामागे काहीतरी कारणे असतील असेही त्यांनी म्हटले होते. कोण कुठल्या पदावर बसणार हे पक्षनेतृत्व ठरवेल. कुणी स्वत:ला मुख्यमंत्री घोषित केल्याने तोच मुख्यमंत्री होईल असे नाही असे पायलट यांनी म्हटले होते.

शिवराज सिंह चौहानांकडून सभांचे शतक

ज्योतिरादित्य सिंधिया राहिले दुसऱ्या स्थानी : काँग्रेसकडूनही जोरदार प्रचार

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 165 मतदारसंघांमध्ये जात प्रचारसभा घेतल्या आहेत. तर 80 सभांसोबत केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीला भाजप सेमीफायनल मानून प्रचारात गुंतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुमारे 11 वेळा मध्यप्रदेशचे दौरे केले होते. तर निवडणुकीची घोषणा झाल्यावर 7 दिवसांमध्ये 14 सभा आणि एक रोड शो त्यांनी केला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चार दिवस मध्यप्रदेशात तुफानी प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

‘लाडली बहना’ प्रचारात केंद्रस्थानी

मध्यप्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे गरीब कल्याणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यास यशस्वी ठरले. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बहना आणि लाडली आवास योजनेचा मोठा जोर दिसून आला. गरीब कल्याणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी करण्यास मोदी यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. कमलनाथ-दिग्विजय यांचेही शतक काँग्रेसमध्ये प्रचाराची आघाडी कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी सांभाळली आहे. दोन्ही नेत्यांनी 100 हून अधिक मतदारसंघांमध्ये पोहोचून प्रचार केला. कमलनाथ यांनी 114 प्रचारसभा आणि रोड शो केले. तर दिग्विजय सिंह हे 125 मतदारसंघांमध्ये पोहोचले. त्यांनी सभा कमी संख्येत घेतल्या असल्या तरीही कार्यकर्ता संमेलनावर भर दिला होता. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 8 प्रचारसभांना संबोधित केले आहे. राहुल गांधी यांनी 2 रोड शो, 8 सभा, एक नुक्कड सभा घेतली. तर प्रियांका वड्रा यांनी 8 प्रचारसभा आणि एक रोड शो केला आहे.

बीआरएस उमेदवाराच्या ठिकाणांवर प्राप्तिकरचे छापे

तेलंगणात चालू महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. परंतु या मतदानापूर्वी राज्यात प्राप्तिकर विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी तेलंगणाच्या मिर्यालगुडा मतदारसंघातील बीआरएस उमेदवार आणि विद्यमान आमदार नल्लामोथु भास्कर राव यांच्या कार्यालय, घर आणि काही निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. नल्लामोथु भास्कर राव हे 2014 मध्ये तेलंगणातील मिर्यालगुडा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2018 मध्ये देखील त्यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता. राव हे विद्यार्थी संघ माजी अध्यक्ष राहिले असून तेलंगणा आंदोलनात ते सक्रीय सहभागी होते. प्राप्तिकर विभागाने यापूर्वी हैदराबादमध्ये तेलंगणाच्या मंत्री सबिता इंद्रा रे•ाr यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी छाप्याची कारवाई केली होती. प्राप्तिकर विभागाने गाचीबोवली येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रदीप यांच्या घरात झडती घेतली होती. प्रदीप हे मंत्री रे•ाr यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

राजस्थान, टोंकच्या निवडणुकीवर लाहोरची नजर : खासदार बिधुडी

राजस्थानच्या निवडणुकीवर पाकिस्तानची देखील नजर आहे, विशेषकरून टोंक मतदारसंघावर, असे वक्तव्य भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी केले आहे. टोंक या मतदारसंघात सचिन पायलट हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. टोंकच्या निवडणुकीवर लाहोरची देखील नजर आहे. येथील निवडणुकीचा निकाल लागल्यावर लाहोरऐवजी भारतात लाडू वाटले गेले पाहिजेत, याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे बिधुडी यांनी म्हटले. टोंक मतदारसंघावर हमाससारख्या दहशतवादी संघटना नजर ठेवून आहेत, येथे दुर्घटनेत देखील विशिष्ट समुदायाचा व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबाला नोकरी आणि 50 लाख रुपये दिले जातात. तर दुसरीकडे निर्दोष कन्हैयालाल यांची हत्या दहशतवाद्यांकडून करण्यात आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये दिले गेले. याचमुळे या निवडणुकीवर देशाचीच नव्हे तर देशाबाहेरील शत्रुचीही नजर असल्याचे बिधुडी यांनी म्हटले आहे.

घोटाळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणार

राजस्थान निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र : 12 वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना देणार स्कुटी : सिलिंडरकरता अनुदान

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने संकल्पपत्र (घोषणापत्र) गुरुवारी जारी केले आहे. पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी  गुरुवारी घोषणापत्र सादर केले, यावेळी प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, अर्जुन राम मेघवाल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. संकल्पपत्र केवळ कागदावर लिहिण्यात आलेले शब्द नसून ही अशी वाक्यं आहेत जी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही जे बोललो ते करून दाखविलो हा आमचा इतिहास आहे असे उद्गार न•ा यांनी यावेळी काढले आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 2700 रुपये प्रति क्विंटल दराने गहू खरेदी केला जाणार आहे. याकरता एमएसपीवर बोनस देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांची जप्त झालेली जमीन त्यांना परत करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपने घोषणापत्राद्वारे दिले आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना प्रत्येक गॅस सिलिंडरमागे 450 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक सुरू केले जाणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्थानकात महिला डेस्क सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शहरात अँटी रोमियो स्क्वॉड स्थापन करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

लाडो प्रोत्साहन योजना सुरू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रत्येक मुलीच्या जन्मावर सरकारकडून 2 लाख रुपयांचा बचत बाँड दिला जाईल. मुलगी इयत्ता सहावीत पोहोचल्यावर तिच्या खात्यात 6 हजार रुपये दरवर्षी जमा केले जातील. तर इयत्ता 9 वीमध्ये पोहोचल्यावर तिच्या खात्यात वर्षाकाठी 8 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. इयत्ता 10 वीमध्ये मुलगी पोहोचल्यावर 10 हजार रुपये तर इयत्ता 11 वीमध्ये 12 हजार रुपये आणि इयत्ता 12 वीमध्ये पोहोचल्यावर तिच्या खात्यात 14 हजार रुपये जमा केले जातील. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणासाठी 15 हजार रुपये दिले जातील. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

शासकीय भरती मोहीम

राजस्थानात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. तसेच गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली जाईल. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल. एम्स आणि आयआयटीच्या धर्तीवर राजस्थान इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि राजस्थान इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रत्येक विभागात सुरू केले जाणार आहे. 5 वर्षांमध्ये 2.5 लाख युवांना शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. 15 हजार डॉक्टर्स आणि 20 हजार पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल. रिजनल हेरिटेज सेंटर स्थापन करण्यात येणार असून याकरता 800 कोटी रुपयांची तरतूद असेल. याच्या अंतर्गत स्थानिक संस्कृती, साहित्य, लोकनृत्यापासून महत्त्वपूर्ण गोष्टींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.

मोफत शिक्षणाची व्यवस्था करणार

मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाईल. केजीपासून पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत पुरविण्यात येणार आहे. तर 12 वी उत्तीर्ण होताच स्कुटी दिली जाणार आहे. लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत 6 लाख ग्रामीण महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच त्यांना सशक्त करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. मातृ वंदन योजनेच्या अंतर्गत प्रसूती झालेल्या महिलेला 8 हजार रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दर वर्षी 1200 रुपये जमा करण्यात येतील, यातून त्यांना शालेय गणवेश आणि पुस्तके खरेदी करता येतील असे भाजपने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.