तरुण भारत सेमीफायनल १० नोव्हेंबर २०२३
हवा गेलेल्या फुग्यासारखी काँग्रेसची स्थिती
सतना येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची टिप्पणी : मध्यप्रदेशच्या विकासासाठी काँग्रेसकडे नाही कुठलाही रोडमॅप
मध्यप्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन जाहीर सभा घेतला आहेत. सर्वप्रथम त्यांनी सतना येथील सभेत उपस्थित लाखोंच्या समुदायाला संबोधित केले आहे. ज्याप्रकारे फुग्यातील हवा निघताना तो इकडे तिकडे आवाज करत पडत असतो, तशाचप्रकारे काँग्रेसचे नेते सध्या गोंगाट करत इकडे तिकडे पळत असल्याची टीकात्मक टिप्पणी मोदींनी केली आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसने जनतेसमोर 2 असे नेते उभे केले आहेत, जे कित्येक दशकांपासून राज्यात काँग्रेस चालवत आहेत. सध्या दोघेही परस्परांचे कपडे फाडत आहेत. हेच नेते मध्यप्रदेशला दशकांपर्यंत बीमारू राज्य ठेवण्यासाठी जबाबदार आहेत. हे दोन्ही नेते जनतेला उज्ज्वल भविष्याचा भरवसा देऊ शकत नाहीत. त्यांचा सध्या केवळ एकच अजेंडा आहे, तो म्हणजे 3 डिसेंबरनंतर मध्यप्रदेश काँग्रेसवर कुणाचा मुलगा राज्य करणार. स्वत:च्या पुत्रांना सेट करण्याच्या मोहापायी दोन्ही नेते पूर्ण मध्यप्रदेशला अपसेट करत आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यास सोबत नुकसान देखील आणतो, हे जनतेने लक्षात ठेवावे. काँग्रेस सत्तेवर आल्यास सरकारकडून जनतेला मिळणारी सर्व मदत बंद होईल असा दावा मोदींनी केला आहे.
10 वर्षांमध्ये भाजप सरकारने 33 लाख कोटी रुपये थेट गरीबांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले आहेत, यातील एकाही पैशाची अफरातफर झालेली नाही. काँग्रेस कशाप्रकारे गरीबांच्या वाट्याला येणारी रक्कम हडपत होती याचे जिवंत उदाहरण म्हणजे बनावट लाभार्थी घोटाळा आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या एकूण लोकसंख्येइतके बनावट लाभार्थी काँग्रेसने देशभरात कागदोपत्री तयार केले होते असा आरोप मोदींनी सभेत केला. मोदीने घोटाळे बंद केले आणि काँग्रेसच्या भ्रष्ट काळातील मध्यस्थांची दुकाने बंद केली. भाजप सरकारने शासकीय योजनांचा निधी गरीबांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. गरीबांचे स्वत:चे घर असावे, मोफत धान्य मिळावे, मोफत उपचार प्राप्त व्हावेत याकरता भाजप सरकार लाखो कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, अर्थात देशाचा पैसा गरीबांच्या उपयोगी पडत आहे. परंतु काँग्रेस सरकार असताना देशाचे लाखो कोटी रुपये 2जी घोटाळा, कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याद्वारे हडपण्यात आले होते, परंतु मोदीने हे सर्व घोटाळे बंद केले आहेत असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत. आम्ही लोकशाहीचे भव्य मंदिर नवे संसद भवन तयार केले, याचबरोबर 30 हजार पंचायत भवनंही निर्माण केली आहेत. भाजपचे डबल इंजिन सरकार असल्यामुळे मध्यप्रदेशात गरीबांसाठी लाखो घरांची निर्मिती करता आली. सतना मध्ये देखील गरीबांना 1.32 लाख घरे मिळाली असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
राम मंदिराचा उल्लेख
सध्या सर्वत्र अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भगवान श्री राम मंदिराची चर्चा असते. पूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. सुदैवाने या पावन कालखंडात माझ्या मनात एक गोष्ट वारंवार येते, त्यामुळेच मला वेगाने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. ही गोष्ट ‘राम काज कीन्हें बिनु, मोहि कहां विश्राम... अब रुकना नहीं है, थकना नहीं है’ असे मोदी म्हणाले.
एक मत, तीन कमाल
काँग्रेसचा मध्यप्रदेशातील असत्याचा फुगा मतदानापूर्वीच फुटला आहे. काँग्रेसकडे मध्यप्रदेशच्या विकासाचा कुठलाच रोडमॅप नाही. काँग्रेसच्या थकलेल्या हरलेल्या चेहऱ्यांमध्ये मध्यप्रदेशच्या युवांना कुठलेच भविष्य दिसत नाही. याचमुळे मध्यप्रदेशला भाजपवर भरवसा आहे. मध्यप्रदेशला मोदीच्या गॅरंटीवर भरवसा आहे.मध्यप्रदेशच्या निवडणुकीत प्रत्येक मत त्रिशक्तीने भरलेले आहे. एक मत राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणणार आहे, याचबरोबर हेच मत दिल्लीत मोदीला मजबूत करणार आहे. हेच मत भ्रष्ट काँग्रेसला मध्यप्रदेशच्या सत्तेपासून दूर ठेवणार आहे, म्हणजेच एक मत, तीन कमाल असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
काँग्रेस नेत्यावर उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप
कुमारी शैलजा अडचणीत : ऑडिओ झाला व्हायरल
छत्तीसगडमधील सीपत मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे माजी आमदार अरुण तिवारी यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जारी केलेल्या एका ऑडिओमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. ऑडिओमध्ये एक इसम आपण बेलतरा मतदारसंघात तिकिटाचा दावेदार होतो, परंतु पक्षाने तिकीट दिले नाही, प्रदेश प्रभारी कुमारी शैलजा यांनी चार कोटी रुपयांमध्ये तिकीट विकल्याचा आरोप करत असल्याचे ऐकू येते. 4 कोटी रुपये शैलजा यांच्या पित्याकडे हवालाच्या माध्यमातून पोहोचविण्यात आले आहेत, असेही या ऑडिओत ऐकू येते. अरुण तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत हा ऑडिओ सादर केला आहे. या ऑडिओत संभाषण करणारा व्यक्ती बिलासपूरचे महापौर रामशरण यादव असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे रामशरण यांनी उमेदवारीसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप फेटाळला आहे. हरियाणाच्या रोहतक येथील शाळेत शैलजा यांच्या वडिलांना पैसे देण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे प्रभारी म्हणून जितके नेते येतात, ते स्वत:च्या घरातील तिजोरी भरण्यासाठीच येत असतात असा आरोप तिवारी यांनी केला आहे.
निवडणूक काळात राजकारण्यांना आठवतात भंवरी देवी
30 वर्षांपूर्वीच्या अत्याचाराप्रकरणी न्याय मिळवून देण्याचा दावा : आरोपींची निर्दोष मुक्तता : पीडितेकडून न्यायासाठीचा लढा सुरू
जयपूरच्या एका छोट्याशा खोलीत राहत असलेल्या भंवरी देवी यांच्यावर अलिकडेच हृदयविकाराशी संबंधित शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना न बोलण्याचा सल्ला दिला आहे, परंतु 1992 चा उल्लेख होताच त्या संतप्त होतात. 1992 मध्ये केवळ त्यांचे आयुष्य बदलले नाही तर कार्यस्थळी लैंगिक शोषणाबद्दलचा दृष्टीकोनही बदलला, यामुळे भारतात लैंगिक शोषणविरोधी कायदा अस्तित्वात आला. परंतु भंवरी देवी यांनाच न्यायापासून वंचित ठेवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी झालेल्या सुनावणीतूनच विशाखा दिशानिर्देश जारी करण्यात आले होते.
परंतु दुर्दैव म्हणजे भंवरी देवी स्वत:च्या याचिकेवरील सुनावणीसाठी नव्या तारखेची प्रतीक्षा करत आहेत. राजस्थानात सध्या निवडणूक होत असल्याने भंवरी देवी यांच्याकडे येणाऱ्या राजकारण्यांची हजेरी वाढली आहे. राजकीय नेते त्यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु मागील काही काळात सर्वच पक्षांकडून त्यांच्या दु:खाकडे एकप्रकारे दुर्लक्षच झाले आहे. भंवरी देवी यांच्यावर सामूहिक बलात्कार करणारे लोक त्यांच्यावर एका शासकीय कार्यक्रमामुळेच नाराज होते, भंवरी देवी या राज्य सरकारच्या कार्यक्रमातील सहभागानुसार बालविवाह रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यानंतर तीन वर्षांमध्ये भंवरी देवी यांचे जीवन असह्या ठरले होते, कारण ग्रामस्थ आणि त्यांच्या नातेवाईकांनीच त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. परंतु याहून क्रूर चेष्टा म्हणजे 1995 पर्यंत सर्व आरोपींची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता झाली होती.
मी काय केले? मी कुणाकडून काहीच हिरावून घेत नव्हते. मी केवळ एका मुलीचा जीव वाचवू पाहत होते. मी देखील बालविवाहाची शिकार राहिली आहे. ज्या लोकांनी माझ्यावर बलात्कार केला त्यांचे काय? त्यांच्या दिशेने कुणी बोटही दाखवत नाही अशा शब्दांत संताप व्यक्त करणाऱ्या भंवरी देवी यांनी आरोपींच्या मुक्ततेच्या विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली असून हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. 30 वर्षांपासून अधिक काळ उलटला असला तरीही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. माझ्या आईला न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे असे भंवरी देवी यांचा पुत्र मुकेशने म्हटले आहे.
...अन्यथा कंस देखील मामा होता!
प्रियांका वड्रा यांची शिवराज चौहान यांना उद्देशून उपरोधिक टिप्पणी
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी गुरुवारी चित्रकूट येथे प्रचारसभा घेतली आहे. येथील काँग्रेस उमेदवार नीलांशू चतुर्वेदी यांच्याकरता त्यांनी जाहीरसभा घेतली आहे. यादरम्यान प्रियांका वड्रा यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शिवराज सिंह चौहान हे स्वत:ला मामा म्हणवून घेतात, परंतु नाते हे जपावे लागते, अन्यथा कंस देखील मामाच होता, अशी उपरोधिक टिप्पणी वड्रा यांनी केली आहे.
जुने संसद भवन उत्तमस्थितीत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाकरता हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची थकबाकी देणे टाळले आहे. काँग्रेसने 70 वर्षांमध्ये काहीच केले नाही असे मोदी म्हणतात. तर मग मोदी हे स्वत:च्या उद्योजक मित्रांना काय देत आहेत? लोक 1200, 1400 रुपयांमध्ये सिलिंडर खरेदी करत आहेत याची कल्पना मोदींना आहे का? शिवराज सिंह चौहान यांना लोकांनी समस्या असल्याचे सांगितल्यावर ते मी तुमचा मामा आहे, घाबरू नका असे म्हणतात. शेतकऱ्यांना युरिया न मिळाल्यावरही ते मामा आहे ना असे म्हणतात. राज्यातील परीक्षांमध्ये घोटाळे होत असल्याने युवांचे भविष्य संकटात सापडल्याचा आरोप प्रियांका वड्रा यांनी केला आहे.
मध्यप्रदेशात दरदिनी 17 महिलांचे शोषण होत आहे. लाडली असली तरीही महिलांना सुरक्षा नाही. मामांनी किमान सुरक्षा तरी पुरवावी. येथे अत्याचारावर अत्याचार होत असताना शिवराज सिंह हे मामा असल्याचे सांगत आहेत. नात्याचे कर्तव्य पार पाडावे लागते, अन्यथा कंस देखील मामाच होता. धर्माच्या नावावर मत मागणाऱ्या नेत्यांवरील श्रद्धा कमी करा असे आवाहन प्रियांका वड्रा यांनी केले आहे.
उद्योजकांचे कर्ज होतेय माफ
उद्योजकांचे कर्ज माफ होत असताना शेतकऱ्यांचे प्रतिदिन उत्पन्न केवळ 27 रुपये इतके आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील विमानतळांपासून बंदरापर्यंत सर्वकाही अदानींना देऊन टाकले आहे. युद्ध सुरू असल्याने महागाई असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसने नेहमीच लोकांच्या अधिकारांबद्दल ठाम भूमिका घेतली आहे. आम्ही कधीच लोकांना दान दिल्याचे सांगत नाही. आम्ही लोकांना त्यांचा अधिकार मिळवून दिला असल्याचे त्या म्हणाल्या. एखादे मूल जर शिकत नसेल तर तो लोकशाहीचाच पराभव आहे. आम्ही प्रत्येकासाठी अन्नसुरक्षेचा अधिकार आणला, हे सर्व अधिकार मिळवून देत लोकांना सर्व काही मिळावे हा काँग्रेसचा यामागील हेतू होता. काँग्रेसला बहुमताने विजयी करा, जेणेकरून फकीर आणि मामांकडून जनतेला मुक्ती मिळेल असे प्रियांका वड्रा यांनी उपस्थित समुदायाला उद्देशून म्हटले आहे.
अशोक गेहलोतांचा अर्ज फेटाळण्याची मागणी
भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात जात गेहलोत यांच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गेहलोत यांनी स्वत:वरील गुन्ह्यांचा उल्लेख जाणूनबुजून केला नसल्याचे या तक्रारीत म्हटले गेले आहे. उमेदवारी अर्ज भरताना सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापक्षात सर्व गुन्ह्यांची माहिती देणे अनिवार्य आहे, परंतु अशोक गेहलोत यांनी स्वत:विरोधात नोंद दोन गुन्ह्यांची माहिती लपविली आहे. यातील एक गुन्हा जयपूर येथे नोंद आहे. हे प्रकरण अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर विचाराधीन असल्याचे भाजपने म्हटले आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी गंभीर गुन्ह्यांची माहिती लपविली आहे. यात जमीन घोटाळा आणि एखाद्याच्या घरात बळजबरीने घुसण्याचा गुन्हा सामील आहे. याची दखल घेत गेहलोत यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केल्याचे शेखावत यांनी सांगितले आहे.
काँग्रेस उमेदवाराच्या निवासस्थानी प्राप्तिकर छापे
तेलंगणात कारवाई : गुरुवारी भरणार होते अर्ज
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. खम्मम जिल्ह्dयाच्या पलेरु मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पोंगुलेटी श्रीनिवास रे•ाr यांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले आहेत. माजी खासदार श्रीनिवास रे•ाr यांनी एक दिवस अगोदरच केंद्रीय यंत्रणांकडून छापे टाकले जाण्याची शक्यता व्यक्त केली होती.
प्राप्तिकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे खम्म येथील त्यांच्या घरी आणि कार्यालयात दाखल झाले. कडेकोट बंदोबस्तात पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झडती घेण्यास सुरुवात करण्यात आली. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचे मोबाइल जप्त केले आहेत. श्रीनिवास रे•ाr हे एक व्यावसायिक देखील असून गुरुवारी ते स्वत:चा उमेदवारी अर्ज भरणार होते.
माजी खासदार रे•ाr हे जुलै महिन्यात काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यापूर्वी राज्यातील सत्तारुढ भारत राष्ट्र समितीने त्यांना पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित केले होते. प्राप्तिकर विभागाकडून माझी, माझ्या कुटुंबीयांची, समर्थकांची आणि जिल्ह्यातील अन्य काँग्रेस नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचा दावा रे•ाr यांनी बुधवारी केला होता.
भाजप-बीआरएसमध्ये साटंलोटं
भाजप आणि बीआरएसने काँग्रेस नेत्यांवर छापे टाकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यासाठी संगनमत केले आहे. या छाप्यांमधून काँग्रेस पक्ष तेलंगणात विजयी होत असल्याचे दिसून येते असा दावा रे•ाr यांनी केला.रे•ाr हे काँग्रेस प्रचार समितीचे सह-अध्यक्ष देखील आहेत. पक्षाच्या नेत्यांना पुढील काही दिवस कठिण दिवसांना तोंड द्यावे लागेल. छाप्यांच्या कारवाईमुळे चिंतेत पडू नका असे त्यांनी समर्थकांना उद्देशून म्हटले आहे.
खम्मम येथेही कारवाई
तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत मिळून माजी मंत्री आणि खम्मम येथील काँग्रेस उमेदवार तुम्मला नागेश्वर राव यांच्या घरात झडती घेतली हाती. विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने नागेश्वर राव यांनी अलिकडेच बीआरएसमधून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर राज्याचे परिवहन मंत्री पी. अजय कुमार हे खम्मम येथे बीआरएसचे उमेदवार आहेत.
पोखरणमध्ये ‘हिंदू योगी’ विरुद्ध ‘मुस्लीम धर्मगुरु’
अत्यंत चुरशीची लढत होण्याची चिन्हे : राजस्थानातील सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ
पश्चिम राजस्थानमधील पोखरण मतदारसंघ यावेळी सर्वाधिक चर्चेत आहे. या मतदारसंघात दोन धर्मगुरु आमनेसामने ठाकले आहेत. यातील एक धर्मगुरु हिंदू तर दुसरा मुस्लीम धर्मीय आहे. या निवडणुकीत दोन्ही धर्मगुरुंची प्रतिष्ठा एकप्रकारे पणाला लागली आहे. मागील वेळी देखील हे दोन्ही धर्मगुरु निवडणुकीच्या मैदानात परस्परांच्या विरोधात उतरले होते. काँग्रेसच्या वतीने सालेह मोहम्मद हे निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडून महंत स्वामी प्रतापपुरी उमेदवार आहेत. 2018 च्या निवडणुकीत सालेह मोहम्मद विजयी झाले होते. महंत प्रतापपुरी महाराज यांना केवळ 872 मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
सालेह मोहम्मद
बाडमेरचे रहिवासी सालेह मोहम्मद हे सिंधी मुस्लीम समुदायाचे धर्मगुरु राहिलेले गाजी फकीर यांचे पुत्र आहेत. गाजी फकीर यांच्या निधनानंतर सालेह मोहम्मद हे त्यांचे उत्तराधिकारी ठरले. तसेच ते वर्तमान आमदार देखील आहेत. धर्म माझ्यासाठी कुठलाच मुद्दा नाही. काँग्रेस सरकारकडून झालेल्या विकासकामांच्या आधारावर जनतेसमोर जाऊन मी समर्थन मागत आहे. लोक धर्माचा मुद्दा बाजूला ठेवून विकासकामांसाठी मतदान करतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीत हिंदू-मुस्लीम हा घटक प्रभावी नसल्याचा दावा सालेह यांनी केला आहे.
प्रतापपुरी यांची प्रतिष्ठा पणाला
महंत प्रतापपुरी महाराज हे बाडमेर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावरील महाबार गावाचे रहिवासी आहेत. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणीच गुरुकुलात पाठविले होते. हरियाणाच्या चेशायर जिल्ह्यातील गुरुकुलमध्ये सनातनचे शिक्षण घेतल्यावर ते महंत झाले. तसेच हिंदूंचे अध्यात्मिक उपदेशक देखील झाले. भाजपने 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांना फारच कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. भाजपने यावेळी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस-भाजपमध्ये मुख्य लढत
पोखरण मतदारसंघ 2008 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अस्तित्वात आला होता. आतापर्यंत झालेल्या तीन निवडणुकांपैकी दोन वेळा काँग्रेस तर एकदा भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. 2008 मध्ये सालेह मोहम्मद यांनी भाजपचे शैतान सिंह यांना 339 मतांनी पराभूत केले होते. तर 2013 च्या निवडणुकीत शैतान सिंह यांनी सालेह मोहम्मद यांना 34 हजार 444 मतांनी पराभूत केले होते. 2018 मध्ये भाजपने उमेदवार बदलत पुरी यांना मैदानात उतरविले होते. परंतु सत्ताविरोधी भावनेच्या जोरावर सालेह यांनी विजय मिळविला होता.