For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तरुण भारत’ आता नव्या रुपात !

01:23 PM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘तरुण भारत’ आता नव्या रुपात
Advertisement

नव्या पद्धतीने पृष्ठरचना, आकर्षक रंगसंगती

Advertisement

आपला लाडका ‘तरुण भारत’ आज 1 एप्रिलपासून नव्या, आकर्षक आणि चित्तवेधक रुपात सादर केला जात आहे. या वृत्तपत्राने नेहमीच काळाच्या समवेत रहात आणि लक्षावधी वाचकांच्या बदलत्या अपेक्षांना साथ देत, स्वत:मध्ये परिवर्तन केले आहे. मूळ ध्येयधोरणे आणि समाजाशी बांधिलकी या तत्वांशी कधीच तडजोड न करता, स्वत:च्या रुपात कालमानानुसार आणि नव्या तंत्रज्ञानाला सामावून घेत परिवर्तन, ही आपल्या या वृत्तपत्राची शतकाहूनही अधिक काळ परंपरा राहिली आहे. याच परंपरेला अनुसरुन, गेल्या दोन-तीन महिन्यांच्या प्रयत्नांनी साकारलेले हे परिवर्तन आपल्या वाचकांना आवडेल, याची शाश्वती आम्हाला आहे.

वी पृष्ठरचना (लेआऊट) करताना अनेक बाबींचा विचार करण्यात आला आहे. वाचकांचे पट्कन लक्ष वेधले जाईल, अशा प्रकारे बातम्यांची रचना, वाचकांना अधिक भावणारी रंगसंगती, विशेष वृत्तांसाठी विशेष रचना, प्रत्येक पृष्ठाला आणि पृष्ठांमधील सदरांना अनुरुप नावे आणि टायटल्स दिली गेली आहेत, जेणेकरुन या पृष्ठात आणि या वृत्तात आपल्याला काय वाचावयास मिळणार आहे, याची झलक वाचकास मिळावी आणि त्याची उत्सुकता वाढावी, याकडे लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक वृत्त आणि सदर अधिकाधिक माहितीप्रधान आणि उपयुक्त होईल, याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, रुप बदलताना ‘तरुण भारत’ची सर्व वाचकप्रिय सदरे कायम राहतील, याची दक्षता घेण्यात आलेली आहे. छायाचित्रांचे अधिक चित्तवेधक सादरीकरण, प्रत्येक पृष्ठावरील मुख्य वृत्त आणि अँकर यांची वेधक पद्धतीने मांडणी, प्रत्येक महत्वाच्या आणि मोठ्या वृत्तासह त्यात समाविष्ट असणारी ठळक वैशिष्ट्यो, आकडेवारी आदी माहिती वेधक पद्धतीने सादर केली जाणार आहे. एकंदर, संपूर्ण वृत्तपत्र आणि त्यातील प्रत्येक वृत्त अधिक उठावदार आणि वाचनीय कसे होईल, याकडे नव्या पृष्ठरचनेत विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Advertisement

1919 या वर्षी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबुराव ठाकुर यांनी या ध्येयवादी वृत्तपत्राचा प्रारंभ केला. त्यावेळी छोट्या टॅबलॉईड आकारात प्रसिद्ध होणारा आपला ‘तरुण भारत’ आज एका विशाल वटवृक्षाप्रमाणे विस्तारला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांमधील आपल्या नऊ आवृत्त्यांसह, प्रतिदिन तो लक्षावधी वाचकांच्या भेटीला येत असतो. वाचकांनीही ‘तरुण भारत’वर निरतिशय आणि निस्सीम प्रेम केले आणि आमचा उत्साह जागता ठेवला. या 107 वर्षांच्या कालावधीत देशात आणि जगात अनेक मन्वंतरे घडली. ‘तरुण भारत’ने तत्काळ त्यांची नोंद घेऊन ती वाचकांपर्यंत नेली. त्यामुळे हे वृत्तपत्र वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरले. बदल हा जगाचा कधीच न बदलणारा नियम आहे. त्यामुळे वेळोवेळी स्वत:च्या रुपात या बदलाला स्थान देऊन, नव्या जोमाने वाचकांसमोर आम्ही आजवर येत गेलो आहोत. हे ‘नित्यनूतनत्व’ आजपासून सादर होणाऱ्या या नव्या रुपातून वाचकांसमोर आणत आहोत. त्यावर वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

नवीन अंकाविषयी वाचकांनी पुढील ई-मेलद्वारे आपली मते मांडावीत-feedback@tarunbharat.com

-डॉ. किरण ठाकुर,समूह प्रमूख, सल्लागार संपादक, ‘तरुण भारत’ बेळगाव.

Advertisement
Tags :

.