For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात सिंधुदुर्गकरांच्या नोकरीवर गदा !

04:06 PM Jul 30, 2024 IST | अनुजा कुडतरकर
गोव्यात सिंधुदुर्गकरांच्या नोकरीवर गदा
Advertisement

कंपनीकडून युवकांची हिमाचल प्रदेश, सिक्कीम येथे बदली ; अनेकांवर नोकरीविना उपासमारीची वेळ 

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

वेर्णा येथील सिप्ला कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांबर अन्याय केला जात असून कामगारांची तडकाफडकी बदली हिमाचलप्रदेश, सिक्कीम या ठिकाणी करण्यात येत आहे. यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी शनिवारी पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. या विरोधात घोषणाबाजी करून गोवा सरकारचे लक्ष वेधले होते. सुमारे ३०० पेक्षा अधिक कामगार यात सहभागी झाले होते. यातील ७० टक्के युवक-युवती हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. कंपनीच्या निर्णयामुळे त्यांचा नोकरीवर गदा आली आहे. सिंधुदुर्गत रोजगार नसल्यानं ही मंडळी शेजारील गोवा राज्यात नोकरीसाठी आहेत. मात्र, कंपनीच्या धोरणामुळे त्यांच्यावर नोकरीविना उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या सुपुत्रांची मदत करावी अशी मागणी होत आहे.

Advertisement

मागच्या काही दिवसांपासून वेर्णा येथील सिप्ला कंपनीच्या व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांची सतावणूक सुरू आहे. गोवा, सिंधुदुर्गतील स्थानिक कामगारांची हिमाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यात बदली करण्यात येत आहे. तसेच त्या ठिकाणी कामावर रुजू न झाल्यास कंपनीतून कमी करण्यात येईल, अशी धमकी दिली जात आहे अशी माहीती सिंधुदुर्गतील युवकांनी दिली आहे.
यामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक झालेल्या कामगारांनी गोवा सरकारने याची दखल घ्यावी आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी आझाद मैदान पणजी येथे आंदोलन करण्यात आले होते. येथे कार्यरत कामगारांत गोवा येथील स्थानिकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुमिपुत्रांची संख्या ही अधिक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून न्याय द्यावा अशी विनंती सिंधुदुर्गचे सुपुत्र करत आहेत.

गोव्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात कर्मचाऱ्यांची बदली दूरच्या राज्यात केली जात असल्याबाबतचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता अशाप्रकारे परराज्यात बदली केली जात असल्याचे प्रकार कंपनी करत असून मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांनी कंपनी व्यवस्थापनाला समज द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. दरम्यान, भारतीय कामगार सेनेने देखील हा मुद्दा उचलून धरला आहे.

दरम्यान, या ठिकाणी काम करणारी ७० टक्के मंडळी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. या युवकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारासाठी पर्याय नसल्याने नाईलाजास्तव गोवा येथे नोकरीसाठी जावं लागतं. या कंपनीत दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील बहुतांश सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं आहे. असं असताना कंपनीच्या धोरणामुळे त्यांच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. सिक्कीमला न गेल्यास नोकरी गमवावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन कंपनी व्यवस्थापनाला समज द्यावी अशी विनंती केली जात आहे. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच मुळ सिंधुदुर्गात असल्यानं त्यांच्याकडूनही इथल्या मुलांना अपेक्षा आहेत. गोव्यासह सिंधुदुर्गच्या मुलांचाही त्यांनी विचार करावा अशी मागणी केली आहे. तर जिल्ह्यातील या भुमिपुत्रांना न्याय देण्यासाठी व सुशिक्षित बेरोजगार होण्यापासून वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नोकरीची टांगती तलवार डोक्यावर असल्यानं जिल्ह्यातील या भुमिपुत्रांकडून माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री आ.दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.‌ या नेत्यांकडून न्याय मिळेल या अपेक्षेत हे तरूण आहेत.

Advertisement
Tags :

.