दीपक केसरकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - राजन तेली
सावंतवाडी | प्रतिनिधी
दीपक केसरकर यांना सोडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने कुणालाही निवडून द्यावे असे भावनिक आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. केसरकर यांना शिक्षण विभागातील काही कळत नाही त्यामुळे त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी तेली यांनी केली . तेली यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिक्षण खात्याच्या संचमान्य बाबत प्रश्न उपस्थित केला होता तसेच केसरकर यांना शिक्षण विभागातले काही कळत नसल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तेली यांची भाजपातुन हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती. त्याला तेली यांनी चोख प्रत्युत्तर देत केसरकर यांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्याची मागणी केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातील जनतेने केसरकर सोडून कोणालाही निवडून द्यावे असे आवाहन केले केसरकर निवडून आल्यास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आणखी वीस वर्षे मागे जाणार आहे यापूर्वी पंधरा वर्षात त्यांनी मतदारसंघात कोणतेही काम केले नाही केवळ आश्वासनेच दिली. निवडणुका आल्या की, घोषणा करायच्या ही पूर्वीचीच पद्धत ते आताही राबवत आहेत असेही तेली म्हणाले.