‘तरुण भारत’ने गोव्याचा समृद्ध इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवला
दै. ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांचे प्रतिपादन, सूर्यकिरण हॉटेलमध्ये आयोजित दिवाळी अंक लेखक मेळावा
पणजी : ‘आज डिजिटल युगाने झेप घेतली असली तरी दिवाळी अंकांचे महत्त्व कायम आहे. वृत्तपत्रांवरील जनतेचा विश्वास आम्ही जपला आहे. अशा दिवाळी अंकांच्या माध्यमातून गोव्याचा समृद्ध इतिहास, परंपरा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘तरुण भारत’ करीत आहे, असे प्रतिपादन ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी केले. वाचन संस्कृती जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी अशा अंकांची परंपरा अखंड चालू राहावी.
दर्जेदार साहित्याच्या माध्यमातून हा अंक गोमंतकीय वाचकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणार आहे, असेही किरण ठाकुर म्हणाले. सूर्यकिरण हॉटेल कांपाल, पणजी येथे पार पडलेल्या दैनिक ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंक लेखक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत ते होते. यावेळी व्यासपीठावर दैनिक ‘तरुण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, सरव्यवस्थापक सचिन पोवार, पद्मश्री विनायक खेडेकर व ‘तरुण भारत’, गोवा दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाच्या मानकरी ठरलेल्या डॉ. अक्षता गायतोंडे उपस्थित होत्या.
पुढे बोलताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले की, मराठी दिवाळी अंकाची परंपरा मोठी आहे. त्याकाळी दिवाळी अंक एक वैचारिक खाद्य म्हणून प्रत्येक घरात उपलब्ध असे. इतर फराळांबरोबर बौद्धिक खाद्य मिळावे यासाठी महाराष्ट्रात दिवाळी अंकाची परंपरा सुरु झाली आणि सातत्य टिकवलं गेलं. ही परंपरा मराठी मनाला सुसंस्कृत करणारी आहे. काव्य, कथा, विनोद हा मराठी माणसाचा स्थायी भाव आहे. यातूनच सुसंस्कृतपणा निर्माण होतो. एक संस्कृती टिकवण्याचं काम आपण सध्या करत आहोत. त्यामध्ये गेल्या वर्षापासून या ‘तऊण भारत’ गोवा दिवाळी अंकाची भर पडली आहे, असे किरण ठाकुर यांनी सांगितले.
संपादक सागर जावडेकर यांनी दिवाळी अंकातील विषयांवर भाष्य करताना सांगितले, या वर्षीचा अंक विचार करायला प्रवृत्त करणारे आणि समाजाला प्रेरणा देणारे विषय घेऊन साकारला आहे. प्रत्येक लेखाने वाचकाला नव्या दृष्टीकोनाची दिशा मिळेल. यावेळी पद्मश्री विनायक खेडेकर आणि डॉ. अक्षता गायतोंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थित लेखकांना ‘तरुण भारत’ दिवाळी अंक प्रदान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक सागर जावडेकर यांनी केले. हॉटेल सूर्यकिरणच्या ऐतिहासिक वातावरणात संपन्न झालेला हा मेळावा सर्जनशीलतेचा आणि गोमंतकीय साहित्यप्रेमाचा उत्सव ठरला.
मुखपृष्ठावर झळकणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण : डॉ. अक्षता गायतोंडे
‘गोव्यातील लाखो लोकांमध्ये माझा चेहरा मुखपृष्ठावर झळकला, ही माझ्यासाठी मोठी संधी ठरली. माझ्या कुटुंबासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. मला कला क्षेत्राची विशेष आवड असून, अशी संधी मिळाल्याबद्दल मी ‘तरुण भारत’ची आभारी आहे, असे अक्षता गायतेंडे म्हणाल्या.
माणसं जोडण्याचे काम ‘तऊण भारत’ करत आहे : ठाकुर
‘तरुण भारत’ प्रयोगशील आहे. अन्याय कुठे होत असेल त्याला वाचा फोडण्याचे कार्य आणि लोकांना शिक्षित करणे, सुसंस्कृत करणे आणि माणसं जोडण्याचे काम ‘तऊण भारत’ने आजपर्यंत केले आहे. ‘तरुण भारत’च्या वृत्तपत्रात जवळजवळ दहा आवृत्ती आहेत. त्यात पंधराशे लोक काम करतात. काही झालं तरीही आपल्याकडे बातमी येते, त्याच्यावर संस्कार केले जातात आणि त्याच्यातून वृत्तपत्र आकार घेतं. जी वाचकांची आम्ही पाच ते दहा मिनिटे घेतो ती सत्कारणी लागावी हीच इच्छा त्यामागे असते. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कायम डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतात. जर सर्व प्रक्रिया योजनाबद्ध असेल तर त्याला योग्य स्वरुप येते, असे किरण ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
‘तरुण भारत’तर्फे संस्कृती जपण्याचे कार्य : विनायक खेडेकर
‘तरुण भारत’ घरात आल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. या वृत्तपत्राने गोमंतकीय संस्कृतीचे जतन करण्याचे आणि विश्वासार्हतेचे कार्य सातत्याने केले आहे, असे पद्मश्री विनायक खेडेकर यांनी गौरवोद्गार काढले.
‘तरुण भारत’ने नवोदितांना दिलेले व्यासपीठ म्हणजे खरी संस्कृती सेवा: डॉ. शकुंतला भरणे
‘तरुण भारत’ दिवाळी अंक दरवर्षी नव्या साहित्यिक कल्पनांनी समृद्ध होत आहे. संपादक सागर जावडेकर यांनी प्रत्येक लेखकाला अभिव्यक्तीची संधी देत या अंकाला एक सर्जनशील व्यासपीठ बनवले आहे. सागर जावडेकर मनापासून आणि समर्पणाने कार्य करतात. ’तऊण भारत’ जो वारसा जपत आहे, तो पुढेही तसाच टिकावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.