तारकर्लीतील रापण नौकेच्या आग दुर्घटनेचा पंचनामा; 12 ते 15 लाखांचे नुकसान, मच्छीमारांना मदतीचे निर्देश
तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या नौका ठेवण्याच्या शेडला शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी रात्री आग लागली होती. या आगीत नोंदणी क्रमांक IND-MH-5-NM-2132 असलेली पारंपरिक रापण नौका पूर्णपणे जळून खाक झाली. नौकेवरील मासेमारीचे साहित्य आणि संपूर्ण शेडचेही नुकसान झाले. नौकामालक गुंडू जानू कांदळगावकर यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अंदाजे 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, शेडमध्ये असलेली दुसरी नौका उपस्थित मच्छीमारांच्या तत्परतेमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने पाहणी
घटनेची माहिती मिळताच मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जळालेली नौका, मासेमारीचे साहित्य आणि शेडच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. बाधित नौकामालकाला शासकीय अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची कार्यवाहीही करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांनीही नौकामालकाशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. शासनाच्या नियमांनुसार पात्र ठरणारी मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
रापण मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता
रापण मासेमारी ही कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक सामूहिक मासेमारी पद्धत आहे. या व्यवसायात साधारणतः 50 ते 100 मच्छीमार सहभागी होत असून, अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे नौका, मासेमारीचे साहित्य आणि शेड जळून खाक झाल्याने संबंधित मच्छीमारांच्या रोजगारावर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित योजनांमधून बिगरयांत्रिक नौका बांधणीसाठी तसेच रापणकारांना प्रति सभासद 60 किलोच्या प्रमाणात अर्थसाहाय्य देण्याची तरतूद असल्याची माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेतील बाधित मच्छीमारांना लागू असलेल्या शासकीय योजना आणि नियमांनुसार मदत मिळवून देण्यासाठी विभागामार्फत कार्यवाही केली जाणार आहे.
नितेश राणे यांचे तातडीने मदतीचे निर्देश
या दुर्घटनेची दखल घेत मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बाधित नौकामालक आणि रापण संघातील मच्छीमारांना शासकीय अर्थसाहाय्य कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी जीवितहानी टळली. आता नुकसानग्रस्त मच्छीमारांना आवश्यक साधनसामग्री पुन्हा उभी करण्यासाठी शासनाकडून लवकर मदत मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
