For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तारिक रहमान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

06:37 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
तारिक रहमान यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Advertisement

ढाका-17 मतदारसंघातून निवडणूक लढवणार

Advertisement

वृत्तसंसस्था/ ढाका

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांनी सोमवारी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते 12 फेब्रुवारीच्या निवडणुकीत ढाका-17 मतदारसंघातून निवडणूक लढवतील. सोमवारी दुपारी 12 वाजता सेगुनबागीचा येथील ढाका विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी आपला नामांकन अर्ज सादर केला. 13 व्या संसदीय निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस होता.

Advertisement

तारिक रहमान यांच्यावतीने बीएनपी अध्यक्षांचे सल्लागार अब्दुस सलाम यांनी प्राध्यापक डॉ. फरहाद हलीम डोनार यांच्यासह उमेदवारी अर्ज सादर केला. अब्दुस सलाम यांनी माध्यमांद्वारे कृतज्ञता व्यक्त करताना 17 वर्षांच्या निर्वासनानंतर शहरातील रहिवाशांनी तारिक रहमान यांचे मनापासून स्वागत केल्याचे म्हटले आहे. 12 फेब्रुवारीच्या निवडणुकीत ढाका-17 मधील लोक त्यांना स्वेच्छेने मतदान करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी तारिक रहमान यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यास मान्यता दिली होती. तारिक रहमान यांनी रविवारीच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेट देत बायोमेट्रिक नोंदणीसाठी त्यांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. यापूर्वी त्यांनी मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता.

17 वर्षांनंतर मायदेशी

तारिक रहमान 11 सप्टेंबर 2008 रोजी लंडनला गेले होते. परदेशात राहिल्यामुळे त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, आता 25 डिसेंबर रोजी लंडनहून 17 वर्षांचा स्व-निर्वासनाचा काळ संपवून बांगलादेशला परतल्यानंतर ते निवडणुकीच्या रिंगणात सक्रियपणे वावरताना दिसत आहेत. त्यांची आई म्हणजेच माजी पंतप्रधान खालिदा झिया सध्या ढाका येथील रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. याचदरम्यान आता निवडणुकीच्या उंबरठ्यावर त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत.

Advertisement
Tags :

.