For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेकडून शुल्क, कॅनडा-मेक्सिकोचे प्रत्युत्तर

06:44 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेकडून शुल्क  कॅनडा मेक्सिकोचे प्रत्युत्तर
Advertisement

कॅनडाकडून 25 टक्के आयात शुल्क : 155 अब्ज डॉलर्सच्या व्यापारावर होणार परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ ओटावा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेचा शेजारी देशांसोबत व्यापारी संघर्ष सुरू झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील 155 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवर 25 टक्के शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

Advertisement

30 अब्ज डॉलर्सचे अमेरिकन मद्य आणि फळांच्या आयातीवर मंगळवारपासून नवे शुल्क लागू होणार आहे. तर 125 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर पुढील काळात शुल्क लागू होईल असे ट्रुडो यांनी सांगितले आहे. मंगळवारपासूनच कॅनडातून आयात होणाऱ्या सामग्रीवर अमेरिकेकडून शुल्क आकारण्यात येणार आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोवर 25 टक्के तर चीनवर अतिरिक्त 10 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. या तिन्ही देशांसोबत अमेरिकेची मोठी व्यापारी तूट असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. तर या निर्णयामुळे अमेरिकेचे पैसे वाचणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मेक्सिकोही आक्रमक

मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लाउडिया शिनबाम यांनी स्वत:च्या अर्थमंत्र्यांना प्रत्युत्तरादाखल शुल्क आणि अन्य उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तर मेक्सिको हा गुन्हेगारी टोळ्यांशी जोडलेला असल्याचा ट्रम्प यांचा आरोप शिनबाम यांनी फेटाळला आहे.  समस्यांवर तोडगा शुल्क लादणे नसून सहकार्य असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोतून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के तर चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली होती. या देशांमधून अमेरिकेत अवैध फेंटेनाइल ड्रग पोहोचत असून यामुळे लाखो अमेरिकन नागरिक मृत्युमुखी पडल्याचे व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लीविट यांनी म्हटले होते.

मेक्सिको सरकार करतेय कारवाई

अमेरिकेचे प्रशासन फेंटेनाइलचा वापर रोखू इच्छित असेल तर त्याला स्वत:च्या देशातील रस्त्यांवर अमली पदार्थांची विक्री आणि मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात कारवाई करावी लागेल. मागील चार महिन्यांमध्ये आमच्या सरकारने 40 टनाहून अधिक अमली पदार्थ जप्त केले असून यात 20 दशलक्ष फेंटेनाइल डोस सामील असून 10 हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याचा दावा शीनबाम यांनी केला आहे.

कॅनडा, मेक्सिकोसोबत मुक्त व्यापार करार

अमेरिकेचा कॅनडा आणि मेक्सिकोसोबत मुक्त व्यापार करार आहे. याच्या अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या कुठल्याही आयात-निर्यातीवर शुल्क आकारले जात नाही. ट्रम्प यांनीच स्वत:च्या मागील कार्यकाळात मेक्सिको आणि कॅनडासोबत नॉर्थ अमेरिका फ्रीड ट्रेड अॅग्रिमेंट केला होता. या दोन्ही देशांनी 2023 मध्ये अमेरिकेकडून 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्याच्या सामग्रीची खरेदी केली होती. तर 1.5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक मुल्याची सामग्री अमेरिकेला विकली होती. ट्रम्प यांच्या शुल्कयुद्धाचा सर्वाधिक परिणाम ऑटो, कृषी, तंत्रज्ञान, सुट्या भागांच्या उद्योगावर होणार आहे. शुल्क लादण्यात आल्याने या गोष्टींच्या किमती वाढणार आहेत.

चीनकडून अमेरिकेला इशारा

स्वत:च्या उत्पादनांवर आयात शुल्क लादण्यात आल्याने चीनने अमेरिकेच्या विरोधात डब्ल्यूटीओमध्ये धाव घेण्याचा इशारा दिला आहे.  अमेरिकेचा हा निर्णय डब्ल्यूटीओच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.अमेरिकेकडून एकतर्फीपणे शुल्कवाढ जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. यामुळे द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार सहकार्यात अडथळे निर्माण होणार असल्याचे चीनकडून म्हटले गेले आहे.

Advertisement
Tags :

.