ड्रॅगनच्या डान्सला टॅरिफचा लगाम
तीन महिन्याचा कालावधी समोर आहे. ट्रीट अॅन्ड टॅकल, डायलॉग अॅन्ड डिप्लोमसी या तंत्रांचा वापर करून ट्रम्प चिनी ड्रॅगनला कसे नमवतील यावर त्यांच्या नेतृत्वाची कसोटी सिद्ध होईल. चिनी ड्रॅगन जगाच्या राजकारणाचे हुकमाचे पान आपल्या हातात ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. या ड्रॅगनच्या डान्सला ट्रम्प यांचा लगाम किती यशस्वी होतो यावरच त्यांच्या दुसऱ्या कारकीर्दीचा सुवर्णक्षण अवलंबून आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ युद्धामध्ये एक नवे वळण आले आहे. विशेषत: अमेरिकेने चीनवर 125 टक्के टॅरिफ लादल्यानंतर चीनने तेथे निर्यात करणाऱ्या 18 अमेरिकन उद्योगांवर जबरदस्त प्रतिबंध लावले आहेत. शिवाय अमेरिकेतून येणारे हॉलिवूड चित्रपट चीनमध्ये बंदिस्त केले जाणार आहेत. जशास तसे आणि ठोशास ठोसा या न्यायाने चीनने सुद्धा अमेरिकेला दणका दिला आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे चीनने तक्रार केली आहे. चीनचे असे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला ग्रासले आहे. जगात गुंडगिरी करणाऱ्या अमेरिकेचे टॅरिफ निर्बंध एकांगी आहेत आणि जगाची व्यापारघडी बिघडविणारे आहेत. जागतिक व्यापारामध्ये परस्पर आदानप्रदान आणि परस्पर बहुपक्षीय पातळीवरील व्यापारातील सहकार्याचे जे परस्परावलंबी धोरण 1990 पासून जगाने डंकेल प्रस्तावाच्या आधारे अनुसरले होते त्याला अमेरिकेने काळीमा फासली आहे. त्यामुळे घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचाच हा प्रकार आहे असे चीनला वाटते. उलट, डोनाल्ड ट्रम्प मात्र असे म्हणतात की, आम्ही चीनशी बोलणी करण्यास तयार आहोत. पण ते फार टफ लोक आहेत. गेंड्याच्या कातडीचे आहेत. ते संवादाच्या पातळीवर येतच नाहीत. एकांगी निर्णय घेतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर लढावेच लागेल. त्यांनी जर आमच्याशी सुसंवाद साधला नाही तर आम्ही आणखी टॅरिफचा वरवंटा फिरवू असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. उलट, चीनच्या वाणिज्य मंत्र्याने मात्र हे सारे कसे चुकीचे आहे, चीन प्रतिकूलतेशी लढत आहे आणि अखेरपर्यंत लढत राहील अशी दर्पोक्तीही चीनने व्यक्त केली. शिवाय चीनमधील 18 राष्ट्रीय मालकीच्या सरकारी कंपन्यांना तयार करून त्यांना अमेरिकेच्या टॅरिफ विरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. ज्या पद्धतीने जगातील इतर देशांमध्ये शेअर बाजारात पडझड झाली तशी चीनमध्ये पडझड का झाली नाही? याचे कारण असे की, चीनने सोशल मीडिया पोस्टवर नियंत्रण केले. अनेक अफवा आणि भयवर्धक पोस्ट पसरविण्यावर नियमन ठेवले. त्यामुळे चिनी बाजार मात्र कोसळला नाही. अमेरिकेने कितीही टॅरिफ लादले तरीदेखील चीनच्या शेअर बाजारावर त्याचा तसूभरही परिणाम होणार नाही याची चीनला खात्री वाटते. त्यामुळे चीनची तयारी भक्कम आहे. डोनाल्ड ट्रम्प कितीही आदळआपट करीत असले तरी देखील चिनी ड्रॅगन मात्र त्यांच्याशी लढण्यास तयार आहे. चिनी ड्रॅगनच्या आर्थिक हालचालीवर लगाम घालण्याचा, वेसण घालण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निकराचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा लगाम सर्वांबरोबर लावला. पुन्हा सर्वांना सवलती दिल्या. पण चीनला मात्र लगाम डबल कसला आणि सांगितले की हे एवढे पुरेसे नाही आणखी काळ उलटल्यावर आम्ही आणखी कडक निर्बंध लादू. म्हणजेच ट्रम्प यांना असे म्हणावयाचे आहे की, चिनी ड्रॅगन आमचे जोवर ऐकत नाही तोवर आम्ही त्यांच्यावर निर्बंध लादतच राहू.
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक मंदीचा धोका कसा निर्माण झाला आहे आणि मंदीचे महासंकट कसे येऊ शकते याबद्दल टाइम मासिकाने विशेष अंक प्रकाशित केला आहे. त्यांचे सूत्रकथन असे आहे की, या धोरणाच्या अंमलबजावणीस विलंब झाल्यास संपूर्ण जगात आर्थिक व्यवहारातील गतीशीलता थांबेल आणि लोक भयाच्या चक्रात अडकतील व त्यामुळे मंदीचे संकट उभे राहिल. 100 वर्षांचा विश्वास आणि प्रभाव असलेल्या टाइम मासिकाचे हे संकेत दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत.
शत्रूवर आघात आणि मित्रांना दिलासा?- चीन हा एनिमी नंबर वन आहे त्याला प्रथम वेगळे पाडले पाहिजे. त्याचे विलगीकरण करून ड्रॅगनला नाचविले आहे. पण 80 भागीदार राष्ट्रांना मात्र मदतीचा दिलासा दिला. 90 दिवसांपर्यंत टॅरिफ 10 टक्के वगळता अन्य वाढीव दर प्रलंबित ठेवले आहेत. बुधवारी ट्रम्प यांनी जागतिक अर्थकारणातील प्रतिक्रिया पाहता माघार घेतली आणि त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे तर, आजारी अमेरिकन अर्थकारणावर रामबाण उपाय योजिला. अमेरिकेची बिघडलेली आर्थिक प्रकृती सुधारण्यासाठी टॅरिफ धोरणात सुधारणा करणे आवश्यक होते. थंड व शांत राहिल्याने फायदा होऊ शकतो हे सूत्र ठेवून थोडीशी माघार घेतली असल्याचे म्हणावे लागेल. चीन आणि अमेरिकेतील टॅरिफ युद्धाची तीव्रता भयानक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अर्थपूर्ण मत व्यक्त केले. व्यापार युद्धाने कोणाचाही फायदा झाला नाही. दोन्ही बाजूंनी नुकसान होते हे सत्य उभयपक्षी भांडणारे लोक लक्षात का घेत नाहीत?
स्थगितीचा अर्थ काय?- डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅरिफ धोरणास थोडीशी मुरड घातली आणि त्यांनी कराच्या अंमलबजावणीस पहिल्या दिवसानंतर लगेचच 90 दिवसांची स्थगिती बहाल केली. त्याचे अनेक कंगोरे आहेत. अनेक मार्गांनी विश्लेषण केले जात आहे. जगभरातून मंदीचे संकेत येत असल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांचे ऐकले आणि 90 दिवसांची स्थगिती दिली. याचप्रमाणे त्यांनी कॅनडा व मेक्सिकोवरील पहिल्या दिवसाची कारवाई पुढे एका महिन्याकरीता स्थगित केली होती. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय कसा फिरवावयाचा याबाबतीत ट्रम्प मोठे तरबेज आहेत. ‘हाऊ टू मेक गुड डील’ हे त्यांचे पुस्तक अनेक आवृत्त्यांनी गाजलेले आहे. यावेळी सुद्धा त्यांनी आपल्या भागीदार राष्ट्रांना चर्चेचे दरवाजे खुले केले आहेत. जे चर्चा आणि सुसंवाद साधतील त्यांचे कर कमी होऊ शकतात म्हणजे ते निगोशिएबल आहेत असे त्यांना म्हणावयाचे आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील शेअर बाजाराने 10 टक्क्यांनी उसळी घेतली. हे कल लक्षणीय आहेत. याचा अर्थ असा होतो की, गुंतवणूकदारांना दिलासा देणे हा सुद्धा ट्रम्प यांचा निर्णय सुसंवादास अनुकूल आहे असे म्हणावे लागेल. पण चिनी शेअर बाजार मात्र ट्रम्प यांच्या भूकंपाने फारसा हादरला नाही.
नवे विश्लेषण?- टॅरिफमुळे उठलेले वादळ आता थोडे शांत होईल आणि ट्रम्प यांना विचार करण्यास, अभ्यास करण्यास चांगला वेळ मिळेल. अमेरिकन अर्थकारणाचे एक वेगळे वैशिष्ट्या असे की, तेथे संशोधन व विकासावर अधिक भर दिला जातो. खुद्द ट्रम्प यांनी टॅरिफ जाहीर करण्यापूर्वी सुद्धा या योजनेचा सखोल अभ्यास केला होता आणि त्या आधारे त्यांनी अचूक नियोजन करून निर्णय घोषित केले आहेत. अमेरिकेच्या विकासात चीन ही धोंड आहे, अडसर आहे. ड्रॅगनला वेसण घातल्याशिवाय अमेरिकेचा गरुड पुढे जाऊ शकणार नाही. हे ओळखून ट्रम्प यांनी ड्रॅगनवर दोन मोठे आघात केले. पहिल्या व दुसऱ्या दोन्ही टप्प्यात ड्रॅगनला प्रमुख लक्ष्य केले आहे. आता भविष्यकाळात चीन विरोधी टॅरिफ दरवाढीची अंमलबजावणी कशी होते, ट्रम्प चिनशी पिंगपाँग खेळताना कोणता पवित्रा घेतील यावर उद्याचे भविष्य अवलंबून आहे. भावी अमेरिका चीन सुसंवादावर बरेचसे धोरणात्मक निर्णय अवलंबून असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आणि त्यांचे अर्थमंत्री यांची निवेदने मोठी सूचक व अर्थपूर्ण आहेत. तसेच अमेरिकन वृत्तपत्रातील काही मतमतांतरांचा अभ्यास केला असता असे दिसते की, ट्रम्प यांचा पवित्रा प्रामुख्याने ड्रॅगनचे नृत्य कसे नियंत्रित करता येईल यावर भर देणारा आहे. आधीपासून ट्रम्प चीन विरोधी आक्रमक पवित्रा घेत होते आता ते ड्रॅगनशी मैत्री करून मुत्सद्देगिरीने त्याला पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करतील. पण या टिकटॉक खेळात ड्रॅगन ट्रम्प यांना पलटी देईल काय? जी राष्ट्रे अमेरिकेशी सुसंवाद साधतील, चर्चा आणि विचार विनिमयातून आपल्यावर होणाऱ्या अन्यायकारक अटींबद्दल बोलणी करतील, त्यांचे विषयीचे टॅरिफ धोरण सौम्य होण्याची शक्यता आहे असे सध्याच्या वातावरणातून दिसून येत आहे.
नजीकच्या भविष्यकाळात ट्रम्प यांना चीनशी साटेलोटे करताना करावयाचे प्रयत्न तारेवरची कसरत ठरतील. गोड बोलून 1949 पासून चिनी कॉम्रेडस्नी अमेरिकेला भरपूर लुटले व अमेरिकन बाजारपेठेवर कब्जा केला. ट्रम्प यांना अमेरिकेवर आजवर झालेला कर्जाचा बोजा कमी करावयाचा आहे, अमेरिकेला आर्थिक मुक्तीसाठी भविष्यकाळात तिजोरीमध्ये खडखडाट नव्हे तर चांगली बचत करावी लागेल. त्यासाठी ट्रम्प कडू औषधे देत आहेत. अमेरिकेने हमास-इस्त्राईल आणि युक्रेन-रशिया युद्धात भाग घेतल्यामुळे आर्थिक घडी पार विस्कटली, दिवाळे निघाले. आता अमेरिकेतील हजारो करदात्यांना सुरक्षित वाटले पाहिजे आणि आपले हरवलेले वैभव अमेरिकेला पुन्हा प्राप्त झाले पाहिजे हा त्यांचा दृष्टीकोन आहे. टॅरिफ शुड नॉट फेल, इट मस्ट सक्सिड, टॅरिफ धोरण फसता कामा नये ते यशस्वी केलेच पाहिजे या भावनेने ते पेटले आहेत, आक्रमक झाले आहेत. 90 दिवसांची स्थगिती दिल्यामुळे शेअर बाजार स्थिर होईल आणि झालेले नुकसान भरून निघेल ही एक जमेची बाजू आहे. पण दुसरा धोका असा की उसंत मिळाल्याने चिनी ड्रॅगन अनेक गुप्त खलबते करून अमेरिकेविरुद्ध वातावरण तापविण्याचा प्रयत्न करणार. किंबहुना ड्रॅगनच्या अशा प्रयत्नास सुरूवात झाली आहे. चीन-अमेरिका दरम्यानचा जागतिक पातळीवरील संशयकल्लोळाचा पहिला अंक रंगत आहे. ट्रम्प अव्वल दर्जाचे राजकीय नट आहेत. ते कवितेप्रमाणे गोड बोलतात. कधी आक्रमक होतात तर कधी मिश्किल भूमिका घेतात. आता चिनी नेत्याशी बुद्धिबळाचा खेळ खेळताना ते चीनला चेकमेट कसा देतील हे पहावयाचे आहे. अन्य राष्ट्रांपेक्षाही चीनपासून मोठा धोका असल्यामुळे व्यापार युद्ध थेट पहिल्या क्रमांकाच्या शत्रूशी करावयाचे आहे ही खूणगाठ त्यांनी बांधली आहे. आता बोक्याने उंदराला खेळवावे तसा, चुहा आगे बिल्ली पिछे असा राजकीय खेळ रंगत आहे. ट्रम्प यांचे लक्ष टॅरिफरुपी लोण्याच्या गोळ्यावर आहे. भविष्यात चीनशी आक्रमक टॅरिफ युद्ध करताना त्याचे तीन संभाव्य परिणाम होऊ शकतात. पहिला म्हणजे चीनला आपली चूक कळेल आणि चीन अमेरिकेबरोबर वागताना सौम्य पवित्रा घेईल अशी ट्रम्प यांची अटकळ आहे.
दुसरा म्हणजे जगाच्या शेअर बाजारावर जसा परिणाम झाला तसा चीनच्या शेअर बाजारावर झाला नाही. चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षाही बिकट अवस्थेत आहे आणि तिला जबरदस्त धक्का देऊन (डेड ब्लो) गार करण्यासाठी हीच वेळ आहे हे लक्षात घेऊन अधिकच्या करवाढीचा दणका ट्रम्प यांनी दिला आहे. तिसरा परिणाम म्हणजे चीनला नमविल्यामुळे जगात अमेरिकेचे महासत्ता म्हणून पहिले स्थान कायम राहिल. चीनची अर्थव्यवस्था बंदिस्त आहे असा साम्यवादी मंत्र जपावयाचा आणि जगात मात्र मार्क्सवाद, लेनीनवाद गुंडाळून ठेवून गरीब राष्ट्रांनाही लुटायचे, तेथील निसर्ग, सोने, चांदी, युरेनियम हडप करायचे असे ड्रॅगनचे तंत्र आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर