अमेरिकेशी टॅरिफवर चर्चा होणार!
उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स 21 ते 24 एप्रिल दरम्यान भारत दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजेच प्रतिद्वंद्वी करांच्या निर्णयाला 90 दिवसांसाठी स्थगिती दिल्यानंतर जगातील आर्थिक अस्थिरता सध्या तरी शांत झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, भारत अमेरिकेसोबत व्यापार करारावर वाटाघाटी करत आहे. मुक्त व्यापार करारासाठी अंतिम मुदतीच्या दबावामुळे देशाच्या हितांशी तडजोड करणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे. याचदरम्यान, ट्रम्प यांच्या टीममधील प्रमुख सदस्य, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि मायकेल वॉल्ट्झ भारतात येणार असून टॅरिफच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याचे समजते.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स 21 ते 24 एप्रिल दरम्यान भारत द्रौयावर येणार आहेत. व्हान्स आणि त्यांची भारतीय वंशाची पत्नी उषा यांची भेट काही आठवड्यांपूर्वीच नियोजित असली तरी ट्रम्प यांच्या टॅरिफ आक्रमकतेमुळे 21 एप्रिल रोजी त्यांच्या संभाव्य आगमनाला वेगळेच आयाम मिळाले आहे. सध्या जगभरात चर्चेत असलेल्या प्रतिद्वंद्वी करांच्या मुद्यावर या भेटीमध्ये उच्च पातळीवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मायकेल वॉल्ट्झ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच ते पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींकडून डिनरचे आमंत्रण
भारत दौऱ्यादरम्यान व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान मोदी यांनी डिनरचे आयोजन केले आहे. त्यांची भेट प्रामुख्याने वैयक्तिक असल्याचे सांगितले जात आहे. ते आग्रा आणि जयपूरला भेट देण्याचीही अपेक्षा आहे.
परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्रीही भारत दौरा करणार
पुढील काही महिन्यात परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ हेदेखील भारताला भेट देण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्वाड शिखर परिषदेसाठी भारताचे आयोजन करण्यापूर्वी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या निवडणुकांनंतर शिखर परिषदेच्या तारखा निश्चित केल्या जातील, असे सांगण्यात आले.