For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग

06:07 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग
Advertisement

दोन हिंदू मजुरांची गोळ्या घालून हत्या: दोघेही छत्तीसगडचे रहिवासी

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे पुन्हा एकदा टार्गेट किलिंगच्या घटना घडल्याने हाहाकार निर्माण झाला आहे. हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री विटभट्टीमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. दोघेही छत्तीसगडचे स्थलांतरित मजूर होते. या हल्ल्यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी मजूर रुग्णालयात मरण पावला. मृत तरुणांची ओळख 24 वर्षीय दीपक रात्रे आणि 28 वर्षीय भूपेंद्र अशी पटली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर शुक्रवारी रात्री उशिरा भूपेंद्रला गंभीर अवस्थेत अनंतनाग शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून श्रीनगर शहरातील सौरा येथील सुपर-स्पेशालिटी शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये हलवण्यात आले होते. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला शुक्रवारी रात्री उशिरा कुलगामपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या केलम परिसरात झाला. स्थानिकांनी 10 ते 12 गोळ्यांचा आवाज ऐकल्याचे सांगितले. दहशतवाद्यांनी प्रथम परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर हल्ला केल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.

अलीकडील दहशतवादी हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून काश्मीर खोऱ्यात तीव्र झालेल्या दहशतवादविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर सशस्त्र पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी यांची हत्या केली. त्यानंतर आता या आणखी दोन हत्या झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

अनंतनाग, कुलगाममध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क

छत्तीसगडमधील दोन मजुरांना ठार करणाऱ्या विटभट्टीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील किलम परिसराला घेराव घातला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर अनंतनाग आणि कुलगाममधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्याच्या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस आणि सीआरपीएफ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीची घोषणा

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कुलगाममध्ये दोन मजुरांच्या झालेल्या भ्याड हत्येचा तीव्र शब्दांत निषेध करत निष्पाप जीवांच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येकी 6 लाख रुपयांच्या तात्काळ मदतीव्यतिरिक्त असेल. मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबांप्रति तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि या कठीण काळात सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :

.