कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीवर लक्ष्य

09:02 PM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटामुळे दहशतवादाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे दिसते. राजधानी दिल्लीतील लाल किल्ला व मेट्रो परिसर हा  गजबजलेला भाग म्हणून ओळखला जातो. या भागात कायम प्रवासी आणि पर्यटकांची गर्दी असते. हे लक्षात घेऊनच लाल किल्ल्याच्या परिसरात हा स्फोट घडवून आणण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटासाठी दहशतवादी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत असतात. अगदी सायकल, कचरा पेटी, प्रेशर कुकर, लोकलपासून ते अन्य वाहनांचा वापर करून स्फोट घडविण्यात आल्याचा आजवरचा इतिहास आहे. आता दिल्ली स्फोटासाठी कार हे माध्यम वापरण्यात आल्याचे दिसून येते. यातील आय 20 कार ही सोमवारी दुपारी 3 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल होते काय, 6 वाजून 23 मिनिटांनी कार पार्किंगमधून निघते काय आणि त्यानंतर गाडी सिग्नलजवळ असताना 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट होतो काय, हे सगळेच बुचकळ्यात टाकणारे म्हणता येईल. या कारच्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. किंबहुना ज्या कारमध्ये हा स्फोट झाला, त्या कारचा एकूण प्रवासही चक्रावून टाकणारा म्हणता येईल. या कारचे पासिंग हरियाणातील गुरूग्रामचे. तेथील सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर तिचे रजिस्ट्रेशन होते. पण, नंतर या कारचा तब्बल सात वेळा खरेदी वा विक्री व्यवहार झाल्याचे दिसून येते. अखेर ही कार जम्मू काश्मीरमधील पुलवामापर्यंत येऊन थांबली. तेथील तारीक नावाच्या इसमाने ही कार खरेदी केली. हा तारीक सध्याला फरीदाबादमध्ये राहतो. तारीकची ही कार मोहम्मद उमर चालवत होता. दोनच दिवसांपूर्वी फरिदाबादमधून 2900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. त्या वेळी मुहम्मद शकीलसह तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. ही धरपकड झाल्यानेच तारीकने घाबरून हा आत्मघातकी हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. त्यामध्ये अमोनियम नायट्रेट असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येते. अमोनियम नायट्रेचा उपयोग शेतीच्या खतांकरिता होतो. पण, स्फोट घडवण्यासाठीही त्याचा वापर करता येतो. हे बघता आत्मघातासाठीच या स्फोटकांचा आणि मोहम्मद उमरचा वापर झाला असावा, असा संशय आहे. उमर हा प्लंबिंगची कामे करतो. परंतु, फरिदाबादच्या सारंगपूर स्फोट प्रकरणाशीही त्याचा संबंध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्याला हाताशी धरून हा हल्ला करण्यात आला आहे काय, याचीही पडताळणी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवाम्याच्या घटनेनंतर देशभर खळबळ उडाली होती. या हल्ल्यात अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांना टार्गेट केले होते. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय लष्करानेही पाकिस्तानवर हल्ले केले होते. यात पाकिस्तानची मोठी हानी झाली होती. मात्र, नंतर हे युद्ध थांबवण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुलवाम्याचा रहिवाशी असलेल्या व्यक्तीच्या कारमध्ये झालेल्या या स्फोटाकडे संशयाने पाहिले जात आहे. या स्फोटामागे पुलवामा कनेक्शन तर नाही ना, यादृष्टीनेही भारतीय यंत्रणा तपास करत आहेत. या स्फोटानंतर संशयाची सुई जैश ए मोहंमद या संघटनेकडेही वळली आहे. जैश ए मोहम्मद ही अतिशय कडवी दहशतवादी संघटना म्हणून प्रसिद्ध आहे. दहशतवादी हल्ले, आत्मघातकी हल्ले करणे, तरुणांची माथी भडकवून त्यांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त करणे, कट्टरतावादी विचारसरणीचा प्रसार करणे, हिंसक कारवाया करून समाजात दहशत पसरवणे, हा या संघटनेचा मुख्य कार्यक्रम आहे. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मद संघटनेला टार्गेट केले होते. त्याचा बदला म्हणून जैशने हा हल्ला केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मसूद अझर हा जैश ए मोहम्मद या संघटनेचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो. मसूद अझरचा खात्मा वगैरे बातम्या आजवर अनेकदा प्रसिद्ध झाल्या. पसरल्या. पण, त्या खोट्याच असल्याचे दिसून आले.  भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यात मौलाना मसूद अझरचा हात असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. भारताविरोधात हा क्रूरकर्मा कायम गरळ ओकत असतो. मुख्य म्हणजे मसूदच्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तानकडूनही छुपे सहकार्य मिळत असते. मध्यंतरी या मसूदने महिला अतिरेक्यांच्या शाखेची घोषणा केली होती. या अंतर्गत महिलांसाठी दौरा ए तस्किया हा अभ्यासक्रम सुरू करण्यात करून त्यांना भारताविरुद्ध जिहादसाठी तयार करणार असल्याचे त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले होते. फरिदाबादमध्ये शाहिना या महिला दहशतवाद्याला झालेली अटक हा त्याचाच भाग म्हणता येईल. ही डॉ. शाहिना ही जैशच्या महिला विंगची म्हणजे जमात उल मोमिनातची प्रमुख होती. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिनाला भारतात महिलांना कट्टरपंथी विचारधारेशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मसूद अझरची बहीण सादिया जे पाकिस्तानात करत होती, तेच शाहिना भारतात करत होती. तिचे काही काळ लखनौमध्येही वास्तव्य होते. अल फला विद्यापीठात ती विद्यार्थ्यांना शिकवत होती. त्यामुळे जिहादसाठी तिने किती विद्यार्थ्यांना तयार केले, यावरही आता फोकस करण्यात आला आहे. एकूणच या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होते. जैशसारख्या संघटना किंवा या संघटनेच्या अतिरेक्यांना पाकिस्तानने वेळोवेळी आश्रय दिला आहे. आता दिल्लीवर लक्ष्य साधण्याचे दु:साहस या अतिरेकी प्रवृत्तींनी केले आहे. त्यामुळे आपल्याला सावध रहावे लागेल.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article