तीन महिन्यांत 344 कोटींच्या वसुलीचे टार्गेट
9 महिन्यात 243 कोटींची वसुली
वसुली न झाल्यास विकासकामांवर परिणाम शक्य
कोल्हापूरः आशिष आडिवरेकर
महापालिकेला यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये 588 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. आतापर्यंत 9 महिन्यात महापालिकेच्या विविध विभागांकडून केवळ 41 टक्के म्हणजेच 243 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. उरलेल्या 3 महिन्यात, 90 दिवसांत 344 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट विविध विभागांना पुर्ण करावे लागणार आहे. वसुलीचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होणार आहे.
महापालिकेच्या विविध सुविधांचा आणि विकासकामांचा गाडा विविध करातून जमा होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून जमा उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ लागत नाही. परिणामी, गतवर्षातून पुढील वर्षात अशा अनेक योजनांची स्थिती आहे. त्यातच शासनाकडून विविध योजनातून आलेल्या निधीत महापालिकेचा वाटा द्यावा लागतो. त्यासाठीही काटकसर करावी लागत आहे. त्यामुळे शासन योजना, निधी सोडला तर महापालिकेला स्वनिधीतून काही खर्च करायचा झाल्यास सारासार विचार करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांबाबतही निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीला विविध करातून येणाऱ्या उत्पन्नाचा मोठा आधार असतो.
गतवर्षी 510 कोटींच्या आसपास उद्दिष्ट असताना 465 कोटींची वसुली झाली. वर्षअखेरीस 45 कोटींची तूट होती. 2024-25 चे अंदाजपत्रक करताना 588 कोटींचे उद्दिष्ट विविध विभागांना दिले आहे. त्याची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान आहे. पण 9 महिने झाले तरी त्याच्या पूर्ततेच्यादृष्टीने फारसे प्रयत्न झाल्याचे पहायला मिळालेले नाहीत. गेल्या 9 महिन्यात विविध विभागांकडून केवळ 41 टक्के म्हणजेच 243 कोटींची वसुली झाली आहे. उरलेल्या 3 महिन्यात 344 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट विविध विभागांना पूर्ण करावे लागणार आहे.
2 महिन्यांचा कालावधी
मेमध्ये लोकसभा निवडणुका आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेची यंत्रणा कार्यरत होती. महापालिकेचे 80 टक्के कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. त्याचाही परिणाम वसुलीवर झाल्याची चर्चा आहे. मात्र उर्वरीत वेळात अपेक्षित टार्गेट पुर्ततेचे आवाहन महापालिकेसमोर आहे.
‘कारणे दाखवा’ नोटीसनंतरच वसुलीला गती
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी 25 नोव्हेंबर रोजी वसुलीचा आढावा घेतला होता. यावेळी नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट, परवाना आदी विभागांची वसुली केवळ 25 टक्के होती. वसुलीबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासकांनी 7 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये सहाय्यक संचालक नगररचना विनायक झगडे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफीसर विलास साळोखे, परवाना अधीक्षक अशोक यादव, रवका अधिकारी तसेच प्रभारी पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत यांचा समावेश होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वसुलीचा वेग वाढवला अन् केवळ एका महिन्यात 17 टक्के वसुली केली.
केशवराव, अग्निशमन विभाग आघाडीवर
केशवराव भोसले नाट्यागृहाकडून यंदा 45 लाख 10 हजारांचे उत्पन्न अपेक्षित होते. ते 22 लाख 58 हजारांवर आहे. 8 ऑगस्ट 2024 पासून केशवराव भोसले नाट्यागृह बंद असूनही 50 टक्के वसुली उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अग्निशमन विभागाने 2 कोटी 69 लाखांचे उद्दिष्ट असताना या विभागाकडून 4 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.
करदात्यांनी सहकार्य करावे
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी 25 नोव्हेंबर रोजी वसुलीसंदर्भात बैठक घेऊन आढावा घेतला होता. यामध्ये विविध विभागप्रमुखांना अपेक्षित वसुली मार्चपुर्वी करण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वच विभाग वसुलीसाठी जोर लावत आहेत. थकीत घरफाळा, पाणी बिलासह विविध करदात्यांनी थकीत रक्कम तात्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करावे, कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी केले.