काश्मिरात दोन महिन्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग
पुलवामात बिहारच्या मजुरांवर ग्रेनेड हल्ला ः एकाचा मृत्यू, दोन जखमी
वृत्तसंस्था/ पुलवामा
काश्मीर खोऱयातील पुलवामामधील गदूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात बिहारमधील रहिवासी असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी या भागात नाकाबंदी करत दहतशवाद्यांचा शोध चालविला आहे. तर मृत मजुराचे नाव मोहम्मद मुमताज असल्याचे समजते. बिहारच्या रामपूर येथील पितापुत्र मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
गदूरा गावात एका टेंट हाउसमध्ये काम करणाऱया मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडल्याने टार्गेट किलिंगच्या घटना थांबल्या होत्या. परंतु गुरुवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे दहशतवादी पुन्हा सक्रीय झाल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी बुधवारी श्रीनगरच्या अलोचीबाग येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला होता. एप्रिल महिन्यात दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्हय़ातील लाजूरामध्ये दोन कामगारांवर गोळय़ा झाडल्या होत्या. या हल्ल्यात दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले होते.
5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर बिगरकाश्मिरींवर झालेल्या या हल्ल्याला याच्याशी जोडून पाहिले जात आहे. जैश-ए-मोहम्मद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत असल्याचा इशारा इंटेलिजेन्स ब्युरोने गुरुवारीच दिला होता.