For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तारक आरोलकर याला जमीन विक्रीप्रकरण अटक

07:49 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
तारक आरोलकर याला जमीन विक्रीप्रकरण अटक
Advertisement

गोवा गुन्हे अन्वेषण विभागातर्फे कारवाई : जमिनीचा मालक नसताना उकळले 40 लाख

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : आसगाव येथील जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तब्बल 40 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी क्राईम ब्रांचने (गुन्हे अन्वेषण विभाग) पेडे-म्हापसा येथील संशयित तारक एम. आरोलकर याला अटक केली आहे. याप्रकरणी पंकज बजाज यांनी तक्रार दाखल केली होती.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर 2022 रोजी म्हापसा येथे संशयित तारक आरोलकर याने आपण बार्देश तालुक्यातील असागाव येथील सर्व्हे नंबर 37/4 या जमिनीचे मालक आणि एकमेव अधिकृत मुखत्यार असल्याचे भासवले. सदर जमिनीची कागदपत्रे आणि मालकी हक्क पूर्णपणे स्पष्ट व कायदेशीर असल्याचे सांगून त्याने तक्रारदार पंकज बजाज यांचा विश्वास संपादन केला.

या जमिनीच्या विक्री करारासाठी संशयित आरोलकरने पंकज बजाज यांच्याकडून 40,00,000/- रुपये (चाळीस लाख रुपये) स्वीकारले. पैसे स्वीकारल्यानंतरही संशयित तारक आरोलकर याने खरेदी खताची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली आणि तो तक्रारदाराला टाळू लागला. यामुळे संशय आल्याने पंकज बजाज यांनी या जमिनीबाबत अधिक चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी संशयित तारक आरोलकर विरोधात आयपीसी कलम 420, 406, 467, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा (क्राईम नंबर 85/2026) नोंदवला. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने कारवाई करत संशयित तारक आरोलकर याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमीन ए. नाईक करीत आहेत.

 पूर्णपणे खोट्या कागदपत्रांद्वारे केला व्यवहार

संशयित तारक हा त्या जमिनीचा मालक नव्हता, तसेच त्याच्याकडे कोणताही सामंजस्य करार नव्हता. तक्रारदाराला दाखवण्यात आलेले खरेदी खत पूर्णपणे खोटे आणि बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंकज बजाज यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

Advertisement
Tags :

.