तार नदी प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाकडे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभियंत्यांना दिले आवश्यक निर्देश: नदी स्वच्छ ठेवण्याचे केले आवाहन
म्हापसा : तार नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाद्वारे नदीतील गाळ काढणे, रुंदी वाढविणे तसेच बांध बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ग्रीन पार्क ते तार जंक्शन दरम्यानच्या या कामावर रु. 46 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. या कामाचा आढावा काल मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला आणि डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश अभियंतावर्गास दिला आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, साळगावचे आमदार केदार नाईक, अभियंता सालेलकर, गिरीचे सरपंच कल्पेश नाईक तसेच पंच व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भर उन्हात संपूर्ण भागात फिरुन कामाची पाहणी केली.
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
बस्तोडा ते तार नदीपर्यंतचा सुमारे 8 कि.मी.चा पट्टा विकसित करण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्dयात शेतात साचणारे पाणी कमी होणार आहे. पावसाळ्dयात गिरी पंचायत परिसर, ग्रीन पार्क ते बस्तोडा तार नदीपर्यंतची संपूर्ण शेती पाण्याखाली जात होती. त्यावर उपाययोजना व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे सुमारे 1 हजार हेक्टर शेतीला दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण वर्षांतून दोन वेळा पिक काढणार असल्याचे सांगितले.
बांधकामाविषयी समाधान व्यक्त
बांधकामाचा आढावा आणि माहिती जाणून घेऊन नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले. याकामी साळगावचे आमदार केदार नाईक यांनी बरेच परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर या भागातील शेती पुन्हा पाण्याखाली येणार नाही. शेतकऱ्यांना दुबार पिक काढणे शक्य होणार आहे. यंदा पावसाळ्dयापूर्वी शेतकऱ्यांना कृषी खात्याकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
स्वत:ची जबाबदारी ओळखा, नदी स्वच्छ ठेवा
बंधारा उभारुन हा पट्टा विकसित केला जात आहे. त्याचे सौंदर्य टिकवून ठेवणे तुमच्याच हाती आहे. नदीत किंवा परिसरात कचरा टाकू नका. स्वच्छता राखा. सर्व ठिकाणी कॅमेरे लावणे सरकारला शक्य नाही, त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून नदी स्वच्छ ठेवावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
शंभर बंधाऱ्यांचे काम सुरु : सुभाष शिरोडकर
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, राज्यात अशाप्रकारचे अनेक जलसंधारण प्रकल्प राबविले जात आहेत. सुमारे 100 बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांचा मोठा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. योग्य मशागत केल्यास जमिनीतून भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक प्रगती साधता येईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री, जलस्रोतमंत्र्यांमुळे झाले शक्य : नाईक
आमदार केदार नाईक म्हणाले की, आज तार नदी बंधाऱ्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. गेल्या 25 वर्षांपासून हा प्रकल्प अपूर्ण अवस्थेत होता. या कामाला मुख्dयामंत्री व जलस्रोतमंत्र्यांनी मंजूरी दिल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. कंत्राटदाराकडूनही चांगले काम सुरु आहे. याचा फायदा गिरी भागातील नागरिक, शेतकऱ्यांना होणार आहे. येथील शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली होडीतून...
मुख्यमंत्र्यांनी स्वत: होडीतून फिरुन सुरु असलेल्या कामाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. बस्तोडा येथे उगम पावणारी आणि सुमारे 8 किमी प्रवास करुन तार नदीला मिळणारी ही नदी स्वच्छ करण्यात येत आहे. तिची रुंदीही वाढविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.