तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी विजेती
वृत्तसंस्था, तैपेई सिटी
रविवारी येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या तैपेई खुल्या सुपर-300 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या 17 वर्षीय तन्वी शर्माने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरवरील स्पर्धेतील तन्वीचे हे पहिलेच विजेतेपद आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वी शर्माने व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित नेगुएनचा 21-16, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. तन्वीने हा अंतिम सामना 36 मिनिटांत जिंकला. पीव्ही सिंधूचे माजी मेंटर पार्क तेइ संग हे सध्या तन्वीला मार्गदर्शन करीत आहेत. तन्वी शर्मा ही कनिष्ठ गटातील माजी विश्वविजेती असून तिच्या कामगिरीत सातत्य असल्याने एकाच विश्व कनिष्ठांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत 2 पदके मिळविणारी तन्वी ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. तिने या स्पर्धेत मुलींच्या एकेरीत रौप्यपदक तर मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळविले आहे. आशियाई सांघिक बँडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघामध्ये तन्वीचा समावेश होता.
2025 साली अमेरिकन खुल्या सुपर-300 बॅडमिंटन स्पर्धेत तन्वीने आपल्या वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती. तसेच तिने ओडिशा मास्टर्स आणि गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविल्याने तिचे महिला एकेरीच्या मानांकनातील स्थान चांगलेच वधारले असून ती 35 व्या स्थानावर पोहोचली आहे. तैपेई सिटीच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारी तन्वी ही सर्वात कमी वयाची बॅडमिंटनपटू ठरली आहे. 17 वर्षे आणि 222 व्या दिवशी तन्वीने हा पराक्रम केला आहे.