तन्वी, वेन्नला उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / सोलो (इंडानेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आशिया कनिष्टांच्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा आणि वेन्नला कलागोटला यांनी एकेरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महिला एकेरीच्या येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्य पूर्व फेरीच्या लढतीत द्वितीय मानांकीत तन्वी शर्माने इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकीत विरावानचा केवळ 35 मिनिटांच्या कालावधीत 21-19, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये तन्वीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत प्रतिस्पर्ध्यांवर सलग विजय मिळविले आहेत. दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या वेन्नला कलागोटलाने थायलंडच्या एम. जेनेयापॉर्नचा 21-18, 17-21, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत तन्वीची लढत चीनच्या आठव्या मानांकीत क्विंगशी तर वेन्नलाची लढत चीनच्या लियु या बरोबर होईल.