जागतिक योगासनमध्ये तन्वी रेडीजची सुवर्ण भरारी
गौरव तांबे/चिपळूण
जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही सत्त्यात उतरवता येतात, याची प्रचिती लोटे येथील तन्वी भूषण रेडीज हिने आपल्या दैदिप्यमान कामगिरीतून करून दिली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत तब्बल 78 देशांतील स्पर्धकांना मागे टाकत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तन्वीने ऐतिहासिक सुवर्णपदके पटकावल्याने देशासह संपूर्ण कोकणाची मान अभिमानाने उंचावली आहे. तन्वीच्या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष, कठोर सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि आई-वडील व प्रशिक्षकांचे अथक मार्गदर्शन आहे. इयत्ता तिसरीत असताना ती बहिणीसोबत कथ्थकच्या वर्गाला जात होती. मात्र त्यात तिचे मन काही रमले नाही. आई-वडिलांनी आवडीबद्दल विचारल्यानंतर लहानपणी टिव्हीवर पाहिलेल्या योगासनांची आठवण झाल्यानंतर योगासनाकडे जाण्याचा निर्णय तीने घेतला.
यातूनच तीचा चिपळूण येथील पाग व्यायामशाळेत योगासनाचा प्रवास सुरू झाला. खेड तालुक्यातील लोटे ते चिपळूण असा दररोजचा वडीलांच्या दुचाकीवरील प्रवास, तासन्तास चालणारा कष्टदायक सराव आणि रात्री उशिरा घरी परतण्याचा दिनक्रम अनेक वर्षे सुरू होता. या संपूर्ण प्रवासात वडील भूषण रेडीज यांचा भक्कम आधार आणि आई चैताली रेडीज या सावलीप्रमाणे तिच्या पाठीशी उभी राहिली. मात्र याच प्रवासामुळे तन्वीच्या पाठीला दुखापत झाली. त्या अवस्थेत तिने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला, परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. डॉक्टरांनी तीन महिन्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला. सराव थांबला असला तरी प्रशिक्षक रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे तिने व्यायामशाळेचे वातावरण सोडले नाही. सराव पाहत, शिकत आणि मानसिक तयारी कायम ठेवत तिने दुखापतीवर मात केली. विश्रांतीनंतर तन्वीने एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत यशाची शिखरे गाठली.
तब्बल 40 सुवर्ण पदकांची कमाई
इयत्ता सातवीपासून तन्वीच्या सुवर्ण यात्रेला वेग आला. आतापर्यंत तिने शालेय व राष्ट्रीय स्तरावरील सहा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आठ सुवर्ण आणि दोन रौप्य पदके, खेलो इंडिया स्पर्धेत दोन रौप्य व एक कांस्य, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये एक कांस्य, 2025मधील दुसऱ्या आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाकडून दोन सुवर्ण, तर 2026 मधील पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या खात्यात आजघडीला तब्बल 40 सुवर्ण, 15 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची भर पडली आहे.
रोज चार ते पाच तास नियमित सराव
या यशासाठी तन्वी रोज चार ते पाच तास नियमित सराव करते. संध्याकाळी तीन ते साडेतीन तास योगासनांचा सराव, सकाळी चालणे, प्राणायाम आणि ध्यान असा तिचा दिनक्रम असतो. स्पर्धेच्या तीन-चार महिने आधी जंकफूड पूर्णपणे बंद करून प्रथिनयुक्त आहार, कडधान्ये आणि ड्रायफ्रुट्सवर भर दिला जातो. स्पर्धेपूर्वी साधी सर्दी, खोकलाही परवडत नाही. अँटी-डोपिंग चाचणीमुळे कोणतेही औषध किंवा क्रीम वापरताना देखील अत्यंत दक्षता घ्यावी लागते.
गुऊचा मंत्रच यशामागील मोठा आधार
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणवीर सावंत आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते वामन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तन्वी घडली. वेळेचे नियोजन, शिस्त, आसनातील अचूकता आणि मानसिक बळ या सर्व गोष्टी प्रशिक्षकांकडून शिकायला मिळाल्या. आपले शंभर टक्के सर्वोत्तम द्यायचे, निकालाचा ताण घ्यायचा नाही, हा मंत्रच यशामागील मोठा आधार ठरल्याचे ती सांगते.
कॉमनवेल्थ स्पर्धा तन्वीचे ध्येय
भविष्यात 2030च्या कॉमनवेल्थ स्पर्धा आणि 2036मध्ये अपेक्षित ऑलिम्पिकमध्ये योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण कामगिरी करण्याचे ध्येय तन्वीने ठेवले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार मिळवण्याचीही तिची महत्त्वाकांक्षा आहे.
गाव लहान असो वा मोठे, स्वप्ने मात्र मोठी असावीत
बीएससी (केमिस्ट्री)चे शिक्षण घेत असतानाच खेळ आणि अभ्यास यांचा समतोल साधणे हे मोठे आव्हान असल्याचे तन्वी सांगते. परदेशातील खेळाडू केवळ खेळावर लक्ष केंद्रित करतात; मात्र भारतात खेळासोबत शिक्षण आणि करिअर यांचाही तितकाच विचार करावा लागतो, हा मोठा फरक असल्याचे ती नमूद करते. क्रिकेटपटू विराट कोहली हे तिचे प्रेरणास्थान असून सातत्य, मेहनत आणि देशासाठी खेळण्याची जिद्द यांच्यापासून प्रेरणा मिळत असल्याचे ती सांगते. ग्रामीण भागातून मोठी स्वप्ने पाहणाऱ्या युवकांना संदेश देताना तन्वी म्हणते, गाव लहान असो वा मोठे, स्वप्ने मात्र मोठी असावीत. स्वत:ला ध्येयासाठी पूर्णपणे झोकून दिले तर यशाचा मार्ग आपोआप सापडतो.
मातृभूमीशी प्रामाणिक रहा
यशाच्या शिखरावर पोहोचूनही नम्रता कायम ठेवण्याचा संस्कार आई-वडिलांनी दिला असल्याचे तन्वी सांगते. यश कधीही डोक्यात जाऊ द्यायचे नाही. कितीही मोठे यश मिळाले तरी पाय कायम जमिनीवर असावेत. ज्या मातीने आपल्याला घडवले, त्या मातृभूमीशी आणि देशाशी सदैव प्रामाणिक राहणे, हीच खरी क्रीडाभावना आहे, असे ती अभिमानाने सांगते.